जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर चा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
घवघवीत निकालाने उंचावली गावाची मान!

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेने या परीक्षेत घवघवीत निकाल लावत संपूर्ण परिसरात आपल्या शाळेचा डंका वाजवला आहे
इयत्ता चौथी: परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी ११ होते, त्यापैकी 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत * *इयत्ता सातवी:* परीक्षेस एकूण 28 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असते, हे लखमापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. इयत्ता चौथीतून तब्बल १० तर सातवीतून २३ विद्यार्थी पात्र ठरल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेत राबवले जाणारे गुणवत्तापूर्ण उपक्रम आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली सखोल तयारी, यामुळेच हे घवघवीत यश मिळवता आले, अशी भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे पंचक्रोशीतून भरभरून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि माजी विद्यार्थी संघ, जि. प. उ. प्रा शाळा, लखमापूर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे



