पालक सचिवांनी घेतला जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यातील पायाभुत कामे आणि प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उपक्रमांची सोडवणूक करण्यासाठी अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना दिल्या.
नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा स्तरावरील प्रलंबित मुद्दे शासनाकडे मांडणे व त्याची सोडवणूक करण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकसचिव श्री. रेड्डी म्हणाले, सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ठराविक वेळेत उत्कृष्ट सेवा देणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपासाठी प्रत्येक गाव स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई -पीक पाहणी करिता विद्यार्थ्यांची मदत घेता येते का, याची पडताळणी करावी. झुडपी जंगलाबाबत आढावा घेऊन शासन स्तरावरून काय मदत पाहिजे, त्याची माहिती द्यावी. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण असलेली जमिनीची आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करावी.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची उपलब्धता असल्यामुळे येथे मत्स्यव्यवसायाला चालना द्यावी. चंद्रपूरचे कॅन्सर हॉस्पीटल नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे हॉटाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखी यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये विकसित करून रुग्णांना उत्कृष्ट सेवा द्यावी. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल, याबाबत नियोजन करावे. त्यासाठी उद्योगांची कार्यशाळा आयोजित कराव्यात. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष प्रभावीपणे उपयोगात आणावा. वन्य प्राण्यांचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी ऑनलाईन सिस्टीमचा वापर करावा. विविध विभागांनी शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांचा अभ्यास करून सुटसुटीत टिपणी सादर करावी, अशा सूचना पालकसचिव श्री. रेड्डी दिल्या.
या विषयांचे झाले सादरीकरण :_
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सादरीकरणात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम, १५० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत ई गव्हर्नन्स सुधारणा, फ्लॅगशीप उपक्रमांतर्गत् जलजीवन मिशन, नळ जोडणीची सद्यस्थिती, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, स्वामित्व योजना, भारत नेट प्रकल्प, जमिनीची आरोग्य पत्रिका, किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रस्तावित समृद्धी महामार्ग, १० कोटी वृक्ष लागवड मोहीम, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप आदींची माहिती दिली.
जिल्ह्यातील पायाभूत कामे आणि प्रमुख प्रकल्प :
चंद्रपूर जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेले जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत, चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल, बाबुराव शेडमाके स्टेडियम, पोलीस स्टेशनचे बांधकाम, नवीन चंद्रपूर विकास आराखडा, बॉटनिकल गार्डन प्रकल्प, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, मानव वन्यजीव संघर्षासाठी उपाययोजना, आदर्श शाळा, महिला बचत गट भवन निर्माण करणे, वाचनालय, जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, मोबाईल कॅन्सर व्हॅन, २० ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर रूपांतरित करणे, मॉडेल अंगणवाडी बांधकाम आदी बाबींचे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सादरीकरण केले.



