शेतकऱ्यांचे डिमांड कायम ठेवत कृषी पंपांना वीज जोडणी द्या!
शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले निवेदन

चांदा ब्लास्ट
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी भरलेली डिमांडची रक्कम परत करण्याचे आदेश विद्युत विभागाने दिले आहेत. शेतकऱ्यांना संकटात टाकणारे हे आदेश असून याविषयाकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना डिमांडची रक्कम परत न करता ती कायम ठेवून कृषी पंपाची विद्युत जोडणी द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून केली आहे. तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी भरलेल्या डिमांडबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अनेक शेतकऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.
चंद्रपूर जिल्हा आदिवासी बहुल असून, वीज निर्मितीच्या क्षेत्रात राज्यातील अग्रणी जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून वीज निर्मिती होते. तसेच महाराष्ट्रातील 95% वीज बिल भरणारा जिल्हा आहे. शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी आवश्यक असलेली डिमांड रक्कम महावितरणकडे भरण्यात आलेली आहे. परंतु विविध कारणामुळे या विद्युत जोडण्या अद्याप दिल्या गेल्या नाही. महावितरणने शेतकऱ्यांनी भरलेली डिमांडची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी भरलेली डिमांडची रक्कम परत न करता त्यांना कृषी पंपाचे विद्युत जोडण्या विशेषबाब म्हणून उपलब्ध करून द्याव्यात. त्याअनुषंगाने याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.