बल्लारपूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची निवासी आदिवासी धर्नुविद्या प्रबोधिनी
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
क्रांतिकारी उपक्रमास तात्काळ मान्यता देण्याचे आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना दिले निर्देश.
“मिशन ऑलिम्पिक 2036” च्या दिशेने उचललेले हे पाऊल आदिवासी खेळाडूंच्या स्वप्नांना नवे पंख देणारे ठरेल.
चंद्रपूर : तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धनुर्विद्या प्रबोधिनीला मंजुरी देण्याबाबत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या क्रांतिकारी उपक्रमास तात्काळ मान्यता देण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना दिले आहेत.यामुळे मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे येथील तरुणाईमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून “मिशन ऑलिम्पिक 2036” च्या दिशेने उचललेले हे पाऊल ग्रामीण व आदिवासी खेळाडूंच्या स्वप्नांना नवे पंख देणारे ठरेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
आदिवासी बहुल चंद्रपूर व शेजारील गडचिरोली जिल्हा हे धनुर्विद्या खेळासाठी सुपीक केंद्र मानले जाते.येथील तरुण खेळाडू नैसर्गिक ताकदीमुळे राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत. या भूमीतील तरुण – तरुणींमध्ये अंगभूत शक्ती, चिकाटी आणि जिद्द आहे. त्यांना आंतराष्ट्रीय दर्जाचे योग्य प्रशिक्षण, क्रिडा सुविधा आणि साहित्य मिळाल्यास ते नक्कीच भारताला सुवर्ण पदकं मिळवून देत देशाचे नाव उंचावतील.
याचाच एक भाग म्हणून मिशन ऑलिम्पीक 2036 अंतर्गत जिल्हयातील प्रतिभावान खेळाडूंना धर्नुविद्या या खेळाचे प्रशिक्षण देण्याकरिता तालुका क्रिडा संकुल, बल्लारपूर येथे धर्नुविद्या या खेळाची एक रेंज उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची निवासी आदिवासी धनुर्विद्या प्रबोधिनी स्थापन करण्याबाबतचा रू. 868.76 लक्षांचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांनी दिनांक 21 मार्च 2025 रोजी आदिवासी विभागाकडे सादर केला आहे.
या प्रकल्पास गती देण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने मान्यता देण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रबोधिनी स्थापन करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार असून क्रांतिकारी उपक्रमास तात्काळ मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना दिलेत.
या प्रबोधिनीमुळे आदिवासी तरुणांना जागतिक स्तराचे प्रशिक्षण मिळून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.