ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चिमुकल्या वैष्णवीला मिळाले नवे जीवन

‘मी आज तुमच्यामुळे जीवंत आहे’, असे म्हणत वैष्णवीने मानले आभार

चांदा ब्लास्ट

चिमुकल्या वैष्णवीच्या शब्दांनी आमदार श्री. मुनगंटीवार भारावले

आ. मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे वैष्णवीवर झाल्या होत्या सहा शस्त्रक्रिया

चंद्रपूर – ‘मी आज तुमच्यामुळे जिवंत आहे… आपण सहकार्य केलं नसतं तर मी आज या जगात नसते’… हे शब्द आहेत ११ वर्षांच्या वैष्णवीचे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तिच्या बालपणी अत्यंत क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया आणि अवघड अश्या उपचारासाठी केलेली मदत वैष्णवीने लक्षात ठेवली. आणि आपल्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या नेत्याला भेटल्यानंतर भावनांना वाट मोकळी करून दिली. हे शब्द ऐकताच आ. श्री. मुनगंटीवार देखील भारावून गेले. नवरात्र सुरू असताना देवीचे रूप असलेल्या कुमारिकेने आपल्याबद्दल या व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेल्या. आणि वैष्णवीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी यशस्वी आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेत.

चंद्रपूरच्या भिवापूर वॉर्डात राहणाऱ्या वैष्णवी कुमारस्वामी पोतलवारची कहाणी ही खऱ्या अर्थाने माणुसकीची आणि संवेदनशील नेतृत्वाची जिवंत साक्ष आहे. २०१४ मध्ये चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात वैष्णवीचा जन्म झाला. पण जन्मत:च गंभीर शारीरिक अडचण घेऊन ती या जगात आली. तिच्या शरीरात शौचाचा मार्गच नव्हता. हा धक्का मध्यमवर्गीय पोतलवार कुटुंबासाठी फारच मोठा होता. जन्मानंतर काही तासांतच वैष्णवीची प्रकृती ढासळू लागली. तिचे पोट फुगत होते आणि आई-वडील असहाय झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराची मोठी चिंता समोर होती.

अशा वेळी मित्रांच्या सल्ल्याने वैष्णवीचे वडील कुमारस्वामी यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वसामान्यांच्या दु:खाशी एकरूप होणारे नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. फारच क्लिष्ट अशा या आजारावर एक-दोन नाही तर तब्बल पाच वेळा शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या. कुटुंब खचले, पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी ‘आता सहाव्या शस्त्रक्रियेत नक्की यश मिळेल’, असा विश्वास दिला. आणि नागपूरच्या गेटवेल हॉस्पिटलमध्ये उपचाराची व्यवस्था करून दिली. सहावी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि वैष्णवीला नवे आयुष्य मिळाले.

आज वैष्णवी अकरा वर्षांची आहे. आपली ही वेदनादायी कहाणी ती आई-वडिलांकडून ऐकत आली आहे. त्यामुळे तिला मनोमन इच्छा होती की, ज्या नेत्यामुळे आपण आज या जगात आहोत, त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटावे. ही इच्छा 29 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण झाली. भिवापूर येथे झालेल्या बदकम्मा कार्यक्रमावेळी वैष्णवीची आमदार श्री. मुनगंटीवार यांच्याशी भेट झाली.

वैष्णवीच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या ओठांवर शब्द होते… ‘मी आज तुमच्यामुळे जिवंत आहे. आपण मला सहकार्य केले नसते तर मी या जगात नसते. आपले मन:पूर्वक आभार.’ या भावनिक क्षणी आमदार मुनगंटीवार यांनीही तिच्या डोक्यावर हात ठेवला. ‘मी कायम तुझ्या सोबत आहे. शिक्षण घे, मोठी हो आणि आयुष्यात प्रगती कर,’ असा आशीर्वाद दिला. या भेटीनंतर पोतलवार कुटुंबाचा आनंद शब्दातीत होता. ‘आपल्या मुलीची जीवनयात्रा आज निरंतर आहे, हे फक्त आणि फक्त आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेमुळे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ही कहाणी एका मुलीच्या वेदनांची आहे. त्या वेदनांमधून तिला मिळालेल्या नव्या आयुष्याची आहे. आणि त्याचवेळी लोकांच्या वेदनांना जिव्हाळ्याने समजून घेणाऱ्या संवेदनशील नेतृत्वाची देखील आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांनी केलेली मदत ही केवळ राजकीय प्रतिनिधित्वापुरता मर्यादित नसून, ती खऱ्या अर्थाने मानवी मूल्यांची जपणूक असल्याचे यातून अधोरेखित झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये