रानटी डुकरांच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी
तालुक्यातील चपराळा चालबर्डी शिवारातील घटना : वन्यजीव सुरक्षित, मात्र ग्रामस्थ असुरक्षित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अलीकडेच वन्यजीव व वन सुरक्षतेबाबत शस्त्र प्रक्षीक्षण पार पडले. मात्र जंगला लगत शेत शिवार व वन्यजीवांचा वावर यावर वनविभागाचा कोणताही अंकुश नसल्याने थेट शेतकरी, शेतमजूर रानटी श्वापंदाच्या हल्ल्याचे बळी ठरत आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी चपराळा चालबर्डी शिवारात रामदास नागपुरे यांचे शेतात कापूस वेचणी करिता गेलेल्या चपराळा येथील महिला सरस्वती नवले व सुनंदा नागपुरे यांचेवर रानटी डुकरांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले.महिलांनी आरडाओरडा केल्याने प्रसंगावधान राखून आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेत महिलांचा जीव वाचविला. रानटी डुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या महिलाना तातडीने भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. प्रत्यक्ष घटनास्थळ ते रुग्णालयात दाखल करेपर्यंत ग्राम पंचायत सरपंच विलास
लेडांगे, मारोती कोंडेकर, ज्ञानेश्वर सिडाम, हर्षल खुटेमाटे, कपिल झाडे, यांनी सहकार्य केले.
वनविभागाने रानटी डुकरांचा बंदोबस्त करून गंभीर जखमी महिलाना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी तसेच या रानटी श्वापंदाचा बंदोबस्त करावा, असे सरपंच विलास लेडांगे यांनी मागणी केली आहे.
रानटी डुकरांच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमाविला हे वास्तव आहे. वन्यजीवांचा वावर शेत शिवारात वाढल्याने जीव मुठीत घेऊन शेती कामे करावी लागते. यावर वन विभागाने त्वरित ठोस कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



