ताज्या घडामोडी

एनसीसीच्या प्रशिक्षणातून साहसी व्यक्तिमत्वाचा विकास – कर्नल समीक घोष 

400 कॅडेट्सनी घेतले सैनिकी प्रशिक्षण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेवाग्राम : ‘आजच्या युगात शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध, साहसी, निर्भय व जागरूक बनविणे अत्यंत गरजेचे आहे तरच ते जागतिक पातळीच्या स्पर्धेत टिकू शकतील. या दृष्टिकोनातून एनसीसी चा अभ्यासक्रम समर्पक असून एनसीसी च्या प्रशिक्षणातून साहसी व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन कॅम्प कमांडंट कर्नल समीक घोष यांनी स्थानिक बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात 15 नोव्हेंबर रोजी आयोजित एनसीसीच्या वार्षिक शिबिराच्या समारोपप्रसंगी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना केले.

एनसीसी शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल समीक घोष तर प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा व सुभेदार मेजर दिलबाग सिंग उपस्थित होते. याप्रसंगी एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, कॅप्टन नंदकिशोर बिजागरे, सेकंड ऑफिसर विक्रांत भागवतकर, सेकंड ऑफिसर जयेंद्र वैद्य व थर्ड ऑफिसर स्वप्निल आकाशे, सुभेदार हरिप्रसाद सुभेदार रवींदर सिंग, सुभेदार प्रमोद घोरपडे, सुभेदार हरविंदर सिंग, बटालियन हवालदार मेजर भीमराव जाधव, हवालदार संजय पटले, हवालदार संदीप दुधे व सैन्य प्रशिक्षक उपस्थित होते.

शिबिरात निशानेबाजी, ड्रिल, युद्ध कला, गार्ड ऑफ ऑनर, सैनिकी प्रशिक्षण, विविध विषयांवर व्याख्याने तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. १०० मि. दौड स्पर्धेत राहुल सोयाम, कान्हा राठी, तेजस संगडवार, आशिष शर्मा यांना तर मुलींमधून साक्षी घोडमारे सुहानी कंगाले तेजस्विनी मडावी व स्मिता सातघरे यांनी प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त केले. रांगोळी स्पर्धेत प्रतीक्षा वाघमारे भूमिका चैताळे व राधिका बावणे तर चित्रकला स्पर्धेत दीक्षा पुनवटकर, राधिका बावणे व यथार्थ जानकर यांना प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार मिळाले. एनसीसी अधिकाऱ्यांकरिता निशानेबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गांधी सिटी पब्लिक स्कूलचे एनसीसी अधिकारी विक्रांत भागवतकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या शिवाय कबड्डी प्रश्नमंजुषा व टग ऑफ वार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे सहाय्यक शिबिर प्रमुख म्हणून कॅप्टन नंदकिशोर बिजागरे तर कंपनी कमांडर म्हणून सेकंड ऑफिसर जयेंद्र वैद्य, थर्ड ऑफिसर स्वप्निल आगाशे व सेकंड ऑफिसर विक्रांत भागवतकर यांनी काम पाहिले.

शिबिरादरम्यान ‘सायबर क्राईम’ या विषयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, पोलीस कॉन्स्टेबल अंकित जिभे व स्मिता महाजन यांनी तर पर्यावरण संवर्धन या विषयावर निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी व्याख्यान दिले. कॅप्टन मोहन गुजरकर यांनी व्यक्तिमत्त्व विकास राष्ट्रीय एकात्मता व एनसीसी ‘बी’ व ‘सी’ सर्टिफिकेट याबाबत मार्गदर्शन केले. प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा यांनी सैन्य दलात अधिकारी तसेच सैनिक म्हणून सामील होण्याच्या विविध संधी बाबत मार्गदर्शन केले. कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. मयूर भानारकर यांनी हेल्थ व हायजिन या विषयावर व्याख्यान दिले.

शिबिराचा समारोप ‘हम सब भारतीय है ……’ या एनसीसी गीताने झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये