चंद्रपूर जिल्ह्यात 1-5 तर लोकसभा क्षेत्रात 0 – 6 राहण्याची शक्यता
विधानसभेत जनमताचा कौल कुणाकडे? कोणत्या पक्षाला जनता देणार धक्का?
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असुन राज्यात सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. बऱ्याच ठिकाणी बंडोबा थंडोबा झाल्याचे दिसत असले तरीही आपल्याच पक्षाविरोधात दंड थोपटणारे मल्ल खरेच थंडोबा झालेत की आतल्याआत आपले उपद्रवमूल्य पक्षाला तसेच उमेदवाराला दाखविण्याची तयारी सुरूच आहे हे निकलाअंती स्पष्ट होणार असले तरीही बऱ्याच ठिकाणी असलेली उघड बंडखोरी सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरली आहे हे निश्चित.
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता हा भाग परंपरागत काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकसभा असो वा विधानसभा असो ह्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात बैल जरी उभा केला तरीही तो निवडून येईल असा काळ देखिल पक्षाने बघितला. मात्र मतदार सदासर्वकाळ अशाच मानसिकतेत राहील ह्या अतिआत्मविश्वासामुळे पक्षाने आपली पत कमी केली तर दुसरीकडे भाजपा तसेच एकेकाळी शेतकरी संघटना ह्या पक्षांनी आपली पाळेमुळे घट्ट रोऊन जनमानसात आपल्या पक्षाचे स्थान पक्के करण्याची किमया करून दाखविली. मात्र जिल्ह्यात शिवसेना (दोन्ही गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (दोन्ही गट) अजुनही म्हणावे तशी जागा निर्माण करू शकलेले नाही. जिल्ह्यात दलित व आदिवासी समाजाची मोठी मतदार संख्या आहे. काही विधानसभा क्षेत्रात हे दोन्ही समाज निर्णायक भूमिकेत असले तरीही त्यांच्यातील राजकीय अपरिपक्वता, गटातटाचे राजकारण ह्यामुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आपली जरब निर्माण करण्यात अपयशी ठरत असुन काँग्रेस पक्षाच्या मागे फरफटत जाण्यात हा समाज धन्यता मानत आहे. ह्या दोन्ही समाजाला त्यांच्या क्षमतेची जाणीव झाल्यास ते अनारक्षित आपली जागेवर देखिल आपले उमेदवार सहज निवडून आणु शकतात मात्र त्यासाठी त्यांच्यात स्वशक्ती तसेच सर्वसमावेशकता निर्माण होणे गरजेचे आहे.
विधानसभा 2024 निवडणुकीचा विचार करताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करणे देखिल क्रमप्राप्त ठरते. लोकसभा निवडणुकीचे निकाल विधानसभा निवडणुकीची नांदी ठरेल असे मानल्या जात होते. ह्या निवडणुकीत मोदी नावाचा करिश्मा तसेच विकासाचे पर्यायी नाव म्हणून राज्यात परिचित असलेले राज्याचे हेविवेट मंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांना भाजपाने आपला उमेदवार केले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे आपसातील हेवेदावे व गटबाजी दाखवत उमेदवारी घोषित करण्यास बऱ्यापैकी घोळ घालुन अखेरीस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवून दिवंगत खा. बाळु धानोरकर ह्यांच्या पत्नी व तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर ह्यांना लोकसभेची उमेदवारी दिली.
सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक सहानुभूती, जातीय मतांचे ध्रुवीकरण तसेच काही प्रमाणात असलेली भाजपतील धुसफुस तसेच संविधान बदलाबाबत निर्माण झालेले फेक नरेटिव्ह त्याचप्रमाणे उमेदवार सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या भाषणाची मोडतोड केलेली अर्धवट क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने महिलांमध्ये निर्माण झालेला रोष मोदींच्या सभेवर भारी पडल्याने जिल्ह्यात जवळपास सर्वच विधानसभा क्षेत्रात भाजपची मोठी पिछेहाट झाल्याने प्रतिभा धानोरकर ह्यांनी सुधिर मुनगंटीवार ह्यांच्यावर अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी दणदणीत विजय मिळविला.
ह्या विजयाने काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले तर भाजपमध्ये विचारमंथन सुरू झाले. केवळ चंद्रपूर मधेच नाहीतर संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश तर बऱ्याच कालावधीनंतर भाजपचे शिरकाण ह्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. विजयामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात निर्माण झालेला आत्मविश्वास व भाजपने सामुहिक नेतृत्वाच्या भूमिकेवर येत महायुतीतील इतर पक्षांसह विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली.
जी स्थिती राज्यात अर्थातच ती स्थिती प्रत्येक जिल्ह्यात व पर्यायाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दिसून येत असुन लोकसभा विजयाने मनोबल वाढलेल्या काँग्रेस पक्षाने विधानसभा निहाय उमेदवारी घोषित करताच पक्षात असंतोषाचा भडका उडाला. चंद्रपूर जिल्हा तसेच लोकसभा क्षेत्रात असलेल्या बऱ्याच विधानसभा क्षेत्रात गटातटाच्या राजकारणाने उचल खाल्ल्याने बंडखोरी झाली मात्र पक्षाने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याने तर भाजपने अंतर्गत कलाहावर नियंत्रण ठेवल्याने त्यांची स्थिती लोकसभा निवडणुकीपेक्षा मजबुत झाली असुन महायुती सरकारने आणलेल्या जनहिताच्या योजना, मतदारांवर केलेली खैरात ह्यामुळे महायुती हळुहळू मतदारांवर आपला प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने लोकसभेतील यशाने प्रफुल्लित झालेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसायला लागले असुन चंद्रपूर क्षेत्रातही हे चित्र कायम असल्याने जिल्ह्यात 1 – 5 तर लोकसभा क्षेत्रात 0 – 6 अशी काँग्रेस पक्षाची स्थिती राहण्याची शक्यता नाकारता येत नसून मतदारसंघ निहाय परिस्थिती बाबत पुढील लेखांत लेखाजोखा मांडण्यात येईल.