वरोरा वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शंभर कोटींची मागणी
आमदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

चांदा ब्लास्ट
वरोरा : २०११ च्या ४६५३२ लोकसंख्येनुसार सध्याची लोकसंख्या ५२७०५ गृहित धरुन सन २०५५ च्या प्रकल्पीत वर्षासाठी ६१९७६ इतकी लोकसंख्या गृहीत धरुन वरोरा शहराकरिता वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्याकरीता १०० कोटी चा निधी तात्काळ मंजूर करणे गरजेचे आहे. या बाबत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
वरोरा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न निकाली काढून या शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पाठपुरावा केल्याने जलसंपदा विभागाने १३ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये पाणी आरक्षण वाढवून दिले. त्यामुळे वरोरा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
वरोरा शहरात अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना १९७२ पासून म्हणजेच ५१ वर्षे जुनी झालेली आहे. वरोरा शहराचे आधुनिकीकरण, वाढलेल्या औद्योगिक, शैक्षणिक बाबींमुळे वसाहती मध्ये मोठी वाढ होऊन पाणी पुरवठ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी खासदार स्व. बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पाठपुरावा केला होता. आता ही मागणी मंजूर झाली असून, निधीसाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्र पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात की, २८ -२- २०२२ ला मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक विभाग नागपूर यांचेसह अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता एम.आय.डी.सी. नागपूर, मुख्याधिकारी नगर परीषद वरोरा व पाटबंधारे विभागाचे, GMR व साई वर्धा पॉवर व इतर अधिकाऱ्यांची स्व. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांचे उपस्थितीत बैठक घेऊन वरोरा नगर परीषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजनेकरीता पाणी आरक्षण मंजूर करण्याची मागणी केली होती. याचे फलीत म्हणून उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार २.७० दलघमी अतिरिक्त पाण्याचे मार्डा गावाजवळील उचल करण्याच्या आरक्षणास मंजूरी प्रदान झाली आहे. त्यामुळे जूने ०.९६ दलघमी पाणी आरक्षण व नव्याने मंजूर केलेले २.७० दलघमी असे एकूण ३.६६ दलघमी पाणी आरक्षण वरोरा शहरास प्राप्त झालेले आहे.
आ. धानोरकर यांनी म्हटले की, सुरुवातीला ६४ करोड मध्ये होणारी हि योजना विलंब झाल्यामुळे १०० करोड इतकी अंदाजे खर्चाची झाली असल्याने या योजनेकरीता त्वरीत निधी मंजूर करुन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.