ब्रम्हपुरी येथील ठाणेदाराची दबंगगिरी, भर चौकात फोडले ट्रॅव्हल्स चालकाचे डोके
गाडी का थांबविली नाही म्हणून केली मारहाण ; पोलिस उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हा अधिक्षकाकडे चालकाची लेखी तक्रार
चांदा ब्लास्ट
ब्रम्हपुरी : गडचिरोली कडून नागपूर कडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकाला ख्रिस्तानंद चौकात ठाणेदाराने दंड्याने मारहाण करत चक्क डोके फोडल्याची घटना रविवार सायंकाळी ४ वाजता दरम्यान घडली.वाहनातील सर्व प्रवाशांना उतरवून ट्रॅव्हल्स थेट ठाण्यात नेली.मात्र, चौकातील प्रकरण शूट करण्यात येऊन व्हायरल झाल्याने रात्री उशिरा वाहनासह चालकाला सोडण्यात आले.
शहरातील रेल्वे फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे वाहनचालकांना बराच वेळ गेटवर ताटकळत राहावे लागते. गडचिरोली कडून नागपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स क्र. एम. एच. ४९ ए. टी.३६२५ रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती. दरम्यान आपल्या खासगी वाहन क्र एम. एच.२९ ए. आर. ८८५५ ने परिवारासह ठाणेदार आंभोरे मलाडोंगरी कडून येत होते. ट्रॅव्हल्सच्या डाव्या बाजूने चारचाकी वाहन पुढे नेत ट्रॅव्हल्स थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ठाणेदार यावेळी वर्दित नसल्याने चालकाने वाहन न थांबविता पुढे नेत ख्रिस्तानंद चौकात वाहन उभे केले.
ट्रॅव्हलचा पाठलाग करत ठाणेदार चौकात आले व चालकाला खाली उतरवून हाताने कानशिलात मारले. नंतर ट्रॅफिक पोलिसाला बोलावून त्याच्या दुचाकीला लटकवून असलेला दंडा हातात घेऊन बेदम मारहाण केली. रागाच्या भरात चालकाच्या डोक्यावर दांड्याने जोरात प्रहार केला. त्यामुळे चालकाचे डोके फुटून रक्त वाहू लागले.रक्तबंबाळ अवस्थेत वाहनातील प्रवासी खाली उतरवून ट्रॅव्हल्स ठाण्यात पोलिस घेऊन गेले. ग्रामीण रुग्णालयात चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रकरण तापत असल्याने कोणतीही एफ. आय. आर. दाखल न करता रात्री उशिरा वाहनासह चालकाला सोडून देण्यात आले. चालक मोहन अडविकर याने पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यासाठी आग्रह केला.
मात्र, चालकाची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. आज चालक अडाविकर याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ अधिकारी संबंधित प्रकरणात काय कारवाई करतात याकडे चालक – वाहकांचे लक्ष लागले आहे.