ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील सहा तालुक्यांत विज पडली – 5 नागरिकांचा मृत्यू तर 9 जखमी

5 जनावरांचाही झाला मृत्यु

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरू असून निसर्गाच्या रुद्र अवतारामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट झाला असून तब्बल सहा तालुक्यांत विज पडल्याने 5 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर 5 जनावरांचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यातील पोंभूर्णा, गोंडपिपरी, वरोरा, नागभिड, सिंदेवाही व कोरपना तालुक्यात वज्रपात झाला. पोभूर्णा तालुक्यातील वेळवा माल येथे शेतामध्ये काम करीत असताना वीज पडून 28 वर्षीय अर्चना मोहन मडावी ह्या महिलेचा मृत्यु झाला तर खुशाल विनोद ठाकरे, वय 31 वर्ष, रेखा अरविंद सोनटक्के, वय 45 वर्ष, राधिका राहुल भंडारे, वय 22 वर्ष, सुनंदा नरेंद्र इंगोले, वय 45 वर्ष, वर्षा बिजा सोयाम, वय 40 वर्ष, रेखा ढेकलू कुळमेथे, वय 55 वर्ष हे सहा व्यक्ती जखमी असून त्यांचेवर ग्रामीण  रुग्णालय पोभूर्णा येथे उपचार सुरू आहेत.

नागभीड तालुक्यात दुपारी  03.50 वाजता शफीया सीराजुल शेख रा. नांदेड ता. नागभीड वय 17 वर्षे रोवण्याकरीता शेतावर गेली असता विज पडल्यामुळे जखमी झाल्याने  तिला पुढील उपचारार्थ तळोधी येथील  रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे दुपारी  04.00 वाजता तालुक्यातील सोनापुर तुकुम येथील रहिवासी रंजन जगेश्र्वर बल्लावार यांची म्हैस वीज पडून मरण पावली.

सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथिल कल्पना प्रकाश झोडे वय 45 व अंजना रुपचंद पुसतोडे वय 48 यांचा शेतात काम करीत असताना अंगावर विज पडून मृत्यू झाला. तसेच सुनीता सुरेश डोंगरवार वय 35 या जखमीं झाल्या आहेत.

कोरपना तालुक्यातील चनई बुज येथील पुरुषोत्तम अशोक परचाके वय २७ हे शेतात काम करीत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास विज पडून मरण पावले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील चिवंढा येथिल वन मजूर भारत लिंगा टेकाम, वय ५३ वर्ष, हे वन विभागाचे काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यूमुखी पडले.

वरोरा तालुक्यात वीज पडल्याने चारगाव येथे वीज पडून दोन शेळ्या तर बोरगाव मोकासा येथे दोन बैलांना प्राण गमवावे लागले.

आनंदराव मारुती पेंदोर वय 52 वर्ष हे सुद्धा वीज पडल्याने जखमी झालेले आहेत त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालय गोंडपिंपरी येथे दाखल केले आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये