Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

12 वीच्या विद्यार्थ्याची आश्रमशाळेत आत्महत्या – भर दुपारी घेतला शाळेत गळफास

आश्रमशाळेच्या गलथानपणामुळे मुलाची आत्महत्या - पालकांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

संतोष इंद्राळे जिवती

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असुन चंद्रपूर येथिल प्रसिध्द इंस्पयार कोचिंग क्लासेसच्या वसतिगृहात नीट (NEET) अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील खाजगी आश्रमशाळेत 12 व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने भर दुपारी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वार्ता कळताच जिवती तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार जिवती तालुक्यातील कोदेपुर येथिल नावाजलेल्या स्व. सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेत कला विभागात 12 व्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटना लक्षात येताच शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी त्या खोलीकडे धाव घेऊन त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वीच विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली होती.

कोदेपुर येथील सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जिवती तालुक्यासह परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत असतात, परंतु संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या भोंगळ कारभारामुळे आज एका निरपराध विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा आरोप पालकांनी केला असुन तालुक्यात संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच वसतिगृहाचे अधिक्षक ह्यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

अधिक माहितीनुसार सदर शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक दोन दिवसांपासून रजेवर असुन त्यांनी आपला पदभार इतर कुणाकडेही सोपविला नसल्याची माहिती कळली असुन आश्रम शाळेचे अधिक्षक मनमानी पध्दतीने कारभार करतात व शाळेचे मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक मुक दर्शक बनुन असल्यामुळे विद्यार्थ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे व ह्याचाच परिपाक म्हणून होतकरू आदिवासी विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या असल्याचे दिसत आहे. संस्थेच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र असल्याने संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच अधिक्षकांवर गुन्ह्याची नोंद करून त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजुरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केली असुन मागणी पूर्ण न झाल्यास शाळेच्या आवारातच विद्यार्थ्याचा मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

घटनेसंदर्भात मुख्याध्यापकांशी संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते उडवाउडविची उत्तरे देऊन घटनेमागील सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने त्या विद्यार्थ्याला न्याय मिळणार का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जिवती पोलिसांनी आश्रमशाळा गाठुन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असुन विद्यार्थ्याचा मृतदेह आधी जिवती येथिल रुग्णालयात व त्यानंतर शव विच्छेदन करण्यासाठी गडचांदुर येथे पाठविला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये