Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठीचे भवितव्य :आपली जबाबदारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

             मराठी भाषेचा अभिमान आणि महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, अमृतापेक्षा माझ्या मराठीचे बोल कौतुकास्पद आहेत. खरच, मराठी ही आपली माय भाषा आहे.तिचा आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे. आज या ठिकाणी तिच्या भवितव्याबद्दल बोलण्याची, लिहिण्याची वेळ आपल्यावर येत आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

           मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,मराठी म्हणजे संस्कार आणि मराठी म्हणजे आपुलकी. त्यामुळे रुजवू मराठी,फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी असा सुविचार आपल्या मनात येणे अत्यावश्यक आहे.

       ज्याप्रमाणे आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आपल्यासाठी प्रेरणादायी आहे; त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मायबोली सुद्धा तितकीच प्रेरणादायी आहे. मराठी केवळ भाषा नसून संस्कृती आहे व अनादी काळापासून या भाषेचे महत्त्व,अस्तित्व अधोरेखीत आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहेत तितके कोणत्याच भाषेमध्ये तयार झालेले नाहीत. एवढेच नाही तर धार्मिक, पौराणिक,ऐतिहासिक राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रात मराठी भाषेचे आमुलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे,जो केवळ महाराष्ट्र पुरता सीमित नाही. मराठी भाषा आणि संस्कृती च्या संवर्धनाला गती आणि दिशा देण्यासाठीच तर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांत रचनेची उद्दिष्टच भाषांना समृद्ध करण्याची होती.

परंतु मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा करण्यात आलेले प्रयत्न पुरेशा सामर्थ्याने झालेले नाहीत म्हणूनच आज मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज डिजिटल युगामध्ये मराठीचे स्थान काय आहे, याचा विचार आपल्याला करावा लागत आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वा बाबत किंवा स्थाना बाबतच नव्हे तर मराठी भाषेच्या भवितव्या संबंधी गांभीर्याने विचार करण्याची आणि त्या अनुषंगाने आपण कृतिशील होण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज कालच्या इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंजावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जात आहे.

           “हिचे पुत्रआम्ही, हिचे पांग फेडू हिला बसून वैभवाच्या शिरी “

             अशी या महाराष्ट्रातील शूर वीरांची आकांक्षा होती. त्यांच्या अविरत प्रयत्नाने १ मे १९६० च्या मुहूर्तावर मराठी ही राजभाषा झाली. परंतु आजही महाराष्ट्राच्या राजधानीत ती परकी व पोरकी होत आहे, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ज्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्रजांच्या भाषेने आपल्या मनावर अधिराज्य गाजवले. आज प्रत्येक जण आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करून आपल्या मायबोली मराठी पासून दूर करत आहेत. इंग्रजी शाळेत शिकणारी मुले मोबाईल आणि संगणक यावर ऑनलाईन व्हिडिओ तसेच गेम्स पाहत असल्यामुळे त्यांच्यातील वाचनाची गोडी कमी होत आहे आणि मराठी गोष्टी, कविता,इत्यादी साहित्या पासून दुरापास्त होत आहेत. साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी, पु. ल .देशपांडे यांच्या लिखाणातील विनोद त्यांना समजणार नाहीत .तसेच केशवसुतांच्या कविता सुद्धा त्यांच्या ओठावर रेंगाळणार नाहीत. आपल्या मराठी भाषेला फार मोठी प्राचीन परंपरा लाभली आहे परंतु मराठी साहित्याचा दरबार आता हळूहळू रिकामा होऊ लागला आहे. आज शहरी भागामध्ये मराठी माध्यमाची शाळा फार अपवादानेच आढळतात.

त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा फक्त राज्याच्या ग्रामीण भागातच उरलेल्या असल्याचे चित्र आहे. त्यातही मराठीची सक्ती ही संकल्पना नोकरी,व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रात कुठेही अद्याप दृढ झाली नसल्याने बऱ्याच क्षेत्रातून मराठी हद्दपार होत चालल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला व मराठी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या राज्यातील शासकीय नोकर भरतीत मराठी माध्यमांमध्ये शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची गरज आज आहे. मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या अनेक मुलांनी निरनिराळ्या क्षेत्रात असामान्य यश संपादन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती त्याच्या बिलकुल विपरीत आहे. तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या या दुनियेत मराठीला मात्र दुय्यम स्थान मिळत असल्याचे दिसून येत आहे.

          “जेथे पिकते तिथे विकत नाही” असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून आपल्याला मराठी भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! मराठी भाषा संवर्धनाचा विचार करताना आपण समर्थन करणार आहोत हे प्रथम आपण गृहीत धरलं पाहिजे. मराठी भाषे बाबत आपला दृष्टिकोन अतिशय चांगला पाहिजे. तिच्याविषयी अनास्था दर्शक दृष्टिकोन सर्वप्रथम बदलला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी मराठी भाषा बोललीच पाहिजे. तसेच पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंग्रजी सह इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणले पाहिजे.

              “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.”

          मराठी भाषेचा गोडवा गाण्यासाठी कवी सुरेश भट यांनी वरील सुंदर कविता लिहिलेली असून मराठी भाषेविषयी त्यांचे असणारे प्रेम आणि मराठी भाषा ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे,हे यावरून दिसून येते. अशा प्रकारचं प्रेम आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी मराठी भाषेचा गौरव मनामनात सजला पाहिजे, गाजला पाहिजे, वाजला पाहिजे,मी मराठी आहे याचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे.

      शेवटी कवयित्री विजया वाड यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास…” माझी मराठी,मराठी माझी काशी नि पंढरी… तिच्यासाठी जागा आहे माझ्या घरी, माझ्या उरी.”

        अशा प्रकारचे उदात्त विचार आपल्या मनामध्ये असतील तर नक्कीच आपल्या मराठीचे भवितव्य अतिशय उज्वल होईल यात तीळ मात्र शंका नाही.

               ✒️ लेखन

     श्री. गोविंद भाऊराव पेदेवाड

            (प्राथमिक शिक्षक)

      जि.प.प्राथ.शाळा लालगुडा    

         ता.कोरपना जि. चंद्रपूर .

         मो. नं.९६८९९८३५३३

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये