ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजपरिवर्तनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श आत्मसात करावा

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे तरुणांना आवाहन ; त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चंद्रपूर येथे युवा संमेलन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्यातून देशभक्ती, सेवा आणि त्याग यांची शिकवण घेत युवकांनी समाजपरिवर्तनासाठी त्यांचा आदर्श आत्मसात करावा, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण व महानगर तसेच भाजपा युवा वॉरियर्सच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये आयोजित युवा संमेलनात ते बोलत होते.

संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महानगराचे अध्यक्ष विशाल निंबाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, सविता कांबळे, संध्या गुरनुले,राखी कंचर्लावार, आशिष देवतळे, अल्का आत्राम, रामपाल सिंग, सुरज पेदुलवार, किरण बुटले, अनिल डोंगरे, अमित गुंडावार, तनय देशकर, यश बांगडे, प्रवीण तायडे, गणेश रामगुंडावार, ओम पवार आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ३१ मे १७२५ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायप्रिय प्रशासन, धार्मिक स्थळांचे जीर्णोद्धार, आणि जनकल्याणकारी कार्ये यामुळे जनतेनी त्यांना ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी दिली. अहिल्यादेवींनी राज्य जिंकण्यासाठी नव्हे तर रयतेचे मन जिंकण्याचे कार्य केले. इतर राज्यकर्ते भौगोलिक क्षेत्र जिंकण्यासाठी राज्य केले पण अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकत राज्य केले. ३०० वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाच्या मनामनामध्ये जे रुजविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वातून विचारांचा तेज घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा.

तरुणांना मार्गदर्शन करताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर म्हणजे मागास जिल्हा समजू नका. भारत-चीन युद्धात सर्वाधिक सोन्याचे दान देणारा जिल्हा चंद्रपूर आहे. बाबा आमटे यांच्या समाजसेवेचा संदेश देणारा हा जिल्हा आहे. सहनशीलतेला गुणाची, कार्याची जोड द्या. गुणवान होण्याचा संकल्प करा, असे आवाहन देखील त्यांनी केले. तरुणांच्या कार्यगुणांमुळे २०४७ मध्ये आपला देश नक्कीच जगातील बलाढ्य देशांनाही मागे टाकेल, असा विश्वासही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सुप्रसिद्ध वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरीत्र, त्यांचे राज्यकारभार, धर्मकार्य या सर्व बाबींवर आपल्या अनोख्या शैलीत प्रकाश टाकला. पतीचे निधन झाल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी स्वत:च्या क्षमता ओळखून राज्यकारभार पुढे नेला नव्हे जनतेच्या हिताचा कारभार केला. या घटनांचे उदाहरण देत डॉ. शेवडे यांनी तरुणांना स्वत:च्या क्षमता ओळखून पुढे जाण्याचा सल्ला दिला. थोड्याशा अपयशाने, शुल्लक कारणांवरुन आत्महत्या करण्याच्या घटना क्लेषदायक आहेत. अहिल्यादेवींनी एकीकडे राजकारण केले पण दुसरीकडे धर्मकारण देखील केले. स्वत:चे सामर्थ्य ओळखा. आपली आवड ओळखा आणि त्यानुसार करिअर निवडा. कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकरित्या विचार करुन पुढे वाटचाल करण्याचा मंत्रही त्यांनी दिला.

स्वत:च्या डोळ्यापुढे पती, सासरे मरण पावले, पोटची मुलगी सती गेली असतानाही अहिल्यादेवी कधी खचल्या नाहीत. त्यांच्या चरीत्रातून प्रेरणा घ्या, अपयशाने खचून जाऊ नका, असे आवाहनही डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये