Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

दूषित पाण्याने मृत्यू प्रकरणाशी एजन्सीचे नाव जोडणे एक षडयंत्र

पाणी पुरवठा कंत्राटदार रजा यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

राजेंद्र मर्दाने, वरोरा

वरोरा : येथील न.प. हद्दीतील मालविय वार्ड परिसरात दूषित पाणी पुरवठा झाल्यानेच चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून यासाठी पाणीपुरवठा योजना अंतर्गत वितरण व्यवस्था दुरुस्तीचे काम मिळालेली विदर्भ मल्टीसर्व्हिस एजन्सी व संबंधित कंत्राटदार कारणीभूत आहे, अशा आशयाच्या प्रकाशित झालेल्या बातम्या असत्य, बिनबुडाच्या, पूर्वग्रहदूषित असून हेतुपुरस्सर एजन्सी व कंत्राटदार यांची प्रतिमा मलिन करणारे कुटील षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप विदर्भ मल्टीसर्व्हिसेस एजन्सीचे संचालक व कंत्राटदार जावेद रजा यांनी पत्रकार परिषदेत केला.

जावेद रजा पुढे आक्रमकपणे म्हणाले की, सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाकरिता पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्था देखभाल व दुरुस्तीसाठी विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला ठेका मिळालेला आहे. या अंतर्गत एजन्सीकडे फिल्टर प्लांट जॅकवेल येथील मोटर पंप दुरुस्ती स्टार्टर पॅनल दुरुस्ती, पाईपलाईन दुरुस्ती, व्हाल दुरुस्ती व विद्युत संबंधित कामाचा समावेश आहे. जलशुद्धीकरण प्रक्रियेशी एजन्सीचा कुठलाही संबंध नाही. पाणीपुरवठा करणे, ही कामे एजन्सीकडे नाही. तरीसुद्धा एजन्सी तर्फे मालवीय वार्डात दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा सर्रास खोट्या बातम्या प्रसार माध्यमांनी शहानिशा न करता प्रकाशित केल्या. एजन्सीवर लावण्यात आलेले सर्व आरोप धादांत खोटे असून तथ्यहीन आहेत. प्रत्यक्षात वरोरा शहराला होणारा पाणीपुरवठा शुद्ध की अशुद्ध हे पाहणे माझ्या एजन्सीचे कामच नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

करारामध्ये एजन्सी च्या कार्याचे स्वरूप, अटी व शर्तीचा समावेश आहे. पाणी पुरवठा, दुरुस्ती व देखभाल संदर्भात नगर परिषदेच्या तक्रार रजिस्टर मध्ये तक्रार नोंदवली असेल किंवा तक्रार निवारणासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपमध्ये माहिती दिली असेल अथवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले तर त्या तक्रारींचा निपटारा आम्ही करतो. या प्रकरणात मालविय वार्डातील दूषित पाणी पुरवठा संबंधित तक्रार नोंदवली गेली नाही व याबाबत एजन्सीला सूचनाही देण्यात आली नाही.

दूषित पाणी प्यायल्याने दोन कुटुंबांतील मोजक्या लोकांना अतिसार झाल्याचे कळते. दूषित पाणी पुरवठा झाला असता तर साहजिकच मोठ्या संख्येने लोक आजारी पडले असते, पण असे घडलेले नाही. वार्डातील एका मुलाचा मृत्यू झाला त्यासाठी दूषित पाण्याशिवाय अनेक कारणे सुद्धा असू शकतात. या कारणांची सखोल चौकशी न करता सरळ सरळ एजन्सी व कंत्राटदाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा एक षडयंत्राचा भाग आहे. याप्रकारच्या उलट सुलट बातम्यांमुळे कंत्राटदार म्हणून माझी व एजन्सीची नाहक बदनामी झाली आहे. एजन्सीच्या संदर्भात जनमानसात चुकीचा संदेश जाऊ नये व आमची विश्वासार्हता कायम राहावी, यासाठी सदर पत्रकार परिषद घ्यावी लागली, असे रजा यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी पाणीपुरवठा करताना व्हालचे कार्य कसे असते, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून झालेला गैरसमज दूर करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये