ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक

खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा - जिल्हाधिकाऱ्यांच्या कृषी विभागाला सुचना

चांदा ब्लास्ट

खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात बोगस बियाणांची वाहतूक व विक्री होणार नाही, याबाबत पोलिस विभागाच्या सहकार्याने मोहीम राबवावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कृषी यंत्रणांनी पावसाळ्याला सुरवात होण्यापूर्वीच सुक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे, यादृष्टीने आतापासूनच कार्यवाही करावी. खरीप विमा मंडळनिहाय काढणे गरजेचे आहे. जेवढे खरीपाचे क्षेत्र आहे, त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विम्यामध्ये समावेश असू नये. यासाठी तालुका कृषी अधिका-यांनी फिल्डवर जावे. तसेच ई-केवायसी बाबत विशेष मोहीम राबवावी. तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कृषी विषयक माहिती शेतक-यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात वाढ : सादरीकरण करतांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार म्हणाले, जिल्ह्यात एकूण ५ लक्ष ५२ हजार ७२९ हेक्टर (४८.३० टक्के) क्षेत्र लागवडीखाली असून खरीप हंगाम २०२४ – २५ मध्ये धानासाठी १ लक्ष ९१ हजार हेक्टर, कापूस १ लक्ष ८० हजार हेक्टर, सोयाबीन ७५ हजार हेक्टर, तूर ३६ हजार हेक्टर व इतर पिकासांठी पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र  ८८२४५ हेक्टर असून प्रत्यक्षात १ लक्ष २० हजार ८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या १३६ टक्के आहे.

जिल्ह्यात खतांची उपलब्धता : जिल्ह्यासाठी युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते आणि मिश्र खते असे एकूण १ लक्ष ५६ हजार ३०० मेट्रीक टन खते कृषी आयुक्तालयाकडून मंजूर झाले आहे. २४ एप्रिल २०२४ अखेर जिल्ह्यात ८९३२९ मेट्रीक टन साठा शिल्लक आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये