निमणी येथील सिमेंट काँक्रीट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ; ना कॉम्पेक्शन, ना सोलिंग… मग रस्ता मजबूत कसा?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मातीमिश्रीत रेती व गिट्टीचा वापर!
कोरपना तालुक्यातील निमणी येथील प्रमोद बुऱ्हाण ते धुणकी रोड मार्गावरील सिमेंट काँक्रीट रोडचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामामध्ये मातीमिश्रीत रेती व गिट्टीचा वापर, तसेच कॉम्पेक्शन व सोलिंगसारख्या मूलभूत प्रक्रिया न केल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर बाब ग्रामस्थांनी पुढे आणली आहे.
कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्रास दुर्लक्ष असल्याचा आरोप केला असून, तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत निमणी येथे ९.९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या कामात खोदाई न करता, सोलिंग न करता आणि सिमेंटचे प्रमाणही अत्यल्प ठेवून निकृष्ट दर्जाची पिसीसी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
याच निकृष्ट पिसीसीच्या वर आर.सी.सी.चे कामही सुरू करण्यात आले असून, त्यामध्येही कॉम्प्रेशनची प्रक्रिया न केल्यामुळे संपूर्ण रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे या सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
80 एम एम गिट्टी टाकून खडीकरण करण्याऐवजी मातीवरच पीसीसी करण्यात आली त्यानंतर काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे पीसीसी करताना प्लेट व्हायब्रेटरने कॉम्प्रेशन करण्यात आले नाही काँक्रीट करताना कुठलेही कॉम्प्रेशन कंत्राटदाराने केले नाही देखावा म्हणून नीडल व्हायब्रेटर साइटवर आणून टाकले माती मिश्रित रेतीचा सर्रास वापर करण्यात आला.
एम. 20 दर्जाचे काँक्रीट नाही निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीवर व संबंधित अधिकाऱ्यांनवर कार्यवाही करावी अशी मागणी उमेश राजुरकर,माजी उपसरपंच ग्रामपंचायत निमणी यांनी केली आहे



