ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने सशक्त नेतृत्वाचा महामार्ग – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

सिंदखेडराजा विकासासाठी ५० कोटी आणि श्रीशैलम ध्यानमंदिरासाठी ३.२५ कोटी निधी,ऐतिहासिक विकासकामांचा आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला अभिमान

चांदा ब्लास्ट

सी फॉर चंद्रपूर ते सी फॉर चॅम्पियन,जिजाऊंच्या लेकींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आ.मुनगंटीवार यांचे आवाहन

जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र महाअधिवेशनाला उपस्थिती

चंद्रपूर : जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र आयोजित महाअधिवेशनाला उपस्थित राहून राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राजमाता जिजाऊंच्या लेकींना आत्मविश्वास, पराक्रम आणि नेतृत्वाची दिशा देणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने या महाअधिवेशनातील उपस्थित प्रत्येक भगिनींचे नेतृत्व, स्वाभिमान आणि कर्तृत्वाची नवी व्याख्या लिहिणार आहे,असा ठाम विश्वास यावेळी आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात पार पडलेल्या या महाअधिवेशनाला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, तसेच घोडकेजी, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,अरविंद गावंडे, दीपक जेऊरकर, सौरभ खेडेकर, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, आनंद जवंजाळे, संगीताताई टोंगे, सारिकाताई कुंभारे, आशाताई ठाकरे, रजनीताई जेऊरकर, लताताई होरे आणि वनिताताई आसुटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या महाअधिवेशनात महिला नेतृत्व, सामाजिक परिवर्तन, संघटन उभारणी, जनआंदोलन आणि राष्ट्राभिमान याविषयांवर मंथन पार पडले. यावेळी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले,जसा ‘सी फॉर चंद्रपूर’ या भावनेने आपण आज येथे एकत्र आलो आहोत, तसाच या अधिवेशनानंतर प्रत्येक भगिनी ‘सी फॉर चॅम्पियन’ बनून प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ.मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक विकासकार्याचा उल्लेख केला. सांस्कृतिक कार्यमंत्री असताना राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमी सिंदखेडराजा विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपश्चर्यास्थळ श्रीशैलम येथे ध्यानमंदिर उभारणीसाठी ३ कोटी २५ लाख रुपये निधी दिल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.या ध्यानमंदिराला नुकतीच देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भेट दिल्याचा उल्लेख करताना त्यांच्या आवाजात समाधान आणि प्रबळ राष्ट्रभक्तीची भावना होती.

आ. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली आणि राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने आजची स्त्री निर्भय, आत्मविश्वासू आणि सक्षम झाली पाहिजे. समाजपरिवर्तनाची दिशा तुमच्या नेतृत्वातूनच घडेल.स्त्रीशक्तीच्या या उभारणीचा प्रवास अधिक सामर्थ्यवान, परिणामकारक आणि परिवर्तन घडविणारा ठरो, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये