Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहीद बाबुराव शेडमाके यांचा लढा केवळ ब्रिटिशविरोधी नव्हता! – सतीश पेंदाम

वीर बाबुराव शेडमाके शहीद स्मृती स्थळी शिलालेखाचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी केवळ ब्रिटिशांविरूद्ध लढा उभारला नव्हता तर देशातील प्रस्थापित मनुवादी विचारांतून वंचित समाजावर अन्याय करणाऱ्यांनाही धडा शिकवला होता. मात्र, खरा इतिहास दडपून ठेवण्यात आला. त्यामुळे वीर बाबुरावच्या क्रांतीचे सूत्र लक्षात घेऊन जल, जंगल व जमिनीचे लढे यापुढे अधिक जोमाने लढवा, असे आवाहन नागपूरचे प्रसिद्ध आदिवासी विचारवंत सतीश पेंदाम यांनी केले. जिल्हा कारागृह परिसरातील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शहीद भूमी परिसरात १९१ व्या जयंतीनिमित्त उभारलेल्या शिलालेख लाेकार्पणप्रसंगी मंगळवारी (दि. १२) प्रबोधन सभेत ते बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते हरीश उईके यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अशोक उईके व सत्कारमूर्ती गोंडराजे केशवशाह आत्राम, वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल कुमरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, आदिवासी कृती समिती सहभागी संघटनांचे सर्व अध्यक्ष उपस्थित होते. चंद्रपुरातील २५ आदिवासी संघटनांनी संयुक्तरीत्या हा कार्यक्रम घेतला. बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा अभ्यासक सतीश पेंदाम यांनी आदिवासींचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचे योगदान आणि आजची वर्तमानस्थिती व त्यावरील पर्याय या अनुषंगाने विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. विविध क्षेत्रात उल्लेख कार्य करणारे गणपत गेडाम, डॉ. पुनम मडावी, डॉ. स्वप्नील म्हरस्काेले, डॉ. चौधरी, प्रब्रह्मानंद मडावी आदींना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

प्रास्ताविक भोला मडावी व संचालन रंजना किन्नाके यांनी केले. कमलेश आत्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे सहायक वित्त व लेखा अधिकारी धर्मराव पेंदाम, समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) भय्याजी येरमे, भय्याजी उईके व मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी अनिल सुरपाम, विजयसिंह मडावी, स्नेहल कन्नाके, गणेश गेडाम, शंकर उईके, राजेंद्र धुर्वे, दिवाकर मेश्राम, विलास मसराम, कपील तिराणकर, शुभम मडावी आदींनी सहकार्य केले.

शिलालेखातून उलगडला इतिहास

जिल्हा परिषदचे सहायक वित्त व लेखा अधिकारी धर्मराव पेंदाम व पत्रकार राजेश मडावी यांनी वीर बाबुराव शेडमाके स्मृती परिसरात शहीद स्थळी शिलालेख उभारण्याची संकल्पना आयोजन समितीकडे मांडली. समितीला ही संकल्पना आवडल्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) भय्याजी येरमे, अभियंता अविनाश मडावी, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजकुमारे, जिल्हा कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे आदींनी पाठबळ दिले. त्यातून हा शिलालेख तयार झाला. तत्कालीन ब्रिटीश डेप्युटी कमिश्नर तथा न्यायमूर्ती कॅ. डब्लू. एच. क्रिक्टन यांनी २१ ऑक्टोबर १८५८ रोजी वीर बाबुराव शेडमाके यांच्याविरूद्ध फाशीचा आदेश दिला. हा संपूर्ण आदेश देखण्या स्वरूपात दगडावर कोरण्यात आला आहे. हा शिलालेख पाहण्यासाठी तरूणाईची गर्दी उसळत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये