तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत सोनुर्ली शाळेची उज्वल कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पंचायत समिती कोरपना आयोजित तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उप्परवाही येथे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली येथील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, वक्तृत्व, लेखन, अभिनय व कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा, संस्कारक्षम अध्यापनाचा व सातत्यपूर्ण परिश्रमांचा ठसा उमटवला. प्राथमिक गटातील एकपात्री भूमिका अभिनय या स्पर्धेत त्रिशा मोरेश्वर सरोदे हिने आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी अभिनय सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच स्वयंस्फूर्त लेखन या स्पर्धेत नंदिनी रवींद्र वैरागडे हिने सर्जनशील लेखनकौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व यशामागे शाळेतील गुणवत्तापूर्ण अध्यापन, सातत्यपूर्ण सराव, तसेच विद्यार्थ्यांतील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची शाळेची परंपरा कारणीभूत ठरली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका प्रभावती हिरादेवे यांच्या कुशल नेतृत्वाखाली मेनका मुंडे, विजय राऊत, भास्कर मडावी, सुनिल अलोने व पल्लवी कांबळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी उपक्रमासाठी कल्याण जोगदंड गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कोरपना तसेच विलास देवळकर केंद्रप्रमुख, केंद्र सोनुर्ली यांनी दिलेली प्रेरणा व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अशीच घवघवीत कामगिरी करतील, असा विश्वास शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला आहे.



