ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीज ग्राहकांच्या सेवेसाठी ऊर्जा चॅटबॉट उपलब्ध

चांदा ब्लास्ट

महावितरणच्या वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीज जोडणी अशा विविध कामांसाठी मदत करणाऱ्या ऊर्जा या चॅट बॉटचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबई येथे केले. महावितरणने आपल्या तीन कोटी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्ससारख्या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा, असे मा. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

मा. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्राहकांना भरवशाचा, दर्जेदार आणि पुरेसा वीज पुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे कामकाज सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऊर्जा चॅट बॉट उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे. ऊर्जा चॅट बॉटमुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. दिवसाचे चोवीस तास आणि सप्ताहाचे सातही दिवस सेवा उपलब्ध असल्याने त्यांना सोईनुसार सेवेचा लाभ घेता येईल.

ग्राहकांना आता महानगर क्षेत्रामध्ये तीन दिवसांत, शहरी भागात सात दिवसात आणि ग्रामीण भागात पंधरा दिवसात वीज जोडणी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

मा. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या नव्या चॅट बॉटची माहिती देणारे सादरीकरण केले.

ऊर्जा हे चॅट बॉट महावितरणने विकसित केले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर आणि ॲपवर ते उपलब्ध आहे. महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चॅट बॉटमध्ये सुविधा आहे. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅट बॉटद्वारे दिली जातात व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन होते. ग्राहकांना त्वरित प्रतिसाद तसेच जलद आणि कार्यक्षम सुविधा प्रदान करणे ही या चॅट बॉटची वैशिष्ट्ये आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये