ताज्या घडामोडी

गुन्हेगाराला संपविण्याचा नादात तेच ठरले गुन्हेगार

पाच युवकांनी केली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिपकची हत्या

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात असलेले उद्योग, कोळसा खाणी, रेल्वे जंक्शन इत्यादी मुळे इथे बाहेरून वास्तव्यास येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे ह्या उद्योगांमुळे शहरात गुन्हेगारी देखिल जास्त आहे. ह्यात अवैध दारू, तंबाखू, अंमली पदार्थ, कोळसा तस्करी, गुंडागर्दी, चोरी, लैंगिक अत्याचार ह्यासोबतच मारपीट, हत्या नित्याच्याच झाल्या आहेत. ह्या गुन्हेगारांकडे चाकु, तलवारी व इतर घातक शस्त्रांसह पिस्तुल व बंदुकाही असल्याचे अनेक प्रकरणात सिद्ध झाले आहे.

थोडे दिवस शांततेने जात नाही तोच शहरात हत्येच्या घटना उघडकीस येतात. असाच प्रकार 15 जुन च्या सकाळी बल्लारपूर वासियांच्या कानी पडला. शहरातील टेकडी परिसरात एका युवकाला त्याच्याच परीसरातील 5 युवकांनी ठार केल्याची घटना उघडकीस आली.  हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघळकीस आली. सवीस्तर वृत्त असे आहे की, सतत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाची त्याच परिसरातील 5 जणांनी रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास मौलाना आझाद वार्डात हत्या केली. हत्येनंतर पाचही जणांनी बल्हारपुर पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती दिली असुन पोलिसांनी त्यांना अटक केली.

बल्हारशाह शहरातील रवींद्रनगर वार्ड, कारवा रोड येथे राहणारा 28 वर्षीय दीपक कैथवास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक परिसरात दहशत माजवत होता. त्याच्यावर मारहाण, वाद घालणे, दहशत दाखविणे ह्यासाह इतर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दिपकने काही दिवसांपूर्वी शुल्लकशा कारणावरून ह्या युवकांशी वाद उकरून काढला व ह्या युवकांना मारहाण केली होती. दिपकच्या वागणुकीने परिसरातील नागरिक त्रस्त होतेच अशातच ह्या पाचही युवकांना त्याने मारहाण केल्याने चिडलेल्या युवकांनी सुड घेण्याचे निश्चित करून 14 जुनच्या मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान संधी साधुन दिपक वर लोखंडी व लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या मारहाणीत दिपक जागीच ठार झाला.

दीपक ठार झाल्याचे लक्षात येताच पाचही आरोपींनी पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली देऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले असुन सर्व आरोपी 18 ते 20 वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील गुन्हेगारीवर पायबंद घालण्यासाठी बल्लारपूर पोलीस काय पाऊले उचलतात व जिल्हा पोलिस अधीक्षक काय उपाययोजना करतात ह्याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये