युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : मागील दोन दिवसांपासून गावातून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह गडचांदूर परिसरात आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृतकाचे नाव गोपाळ रवींद्र धोटे (वय २४), रा. कढोली खुर्द, ता. कोरपना असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ हा शनिवारी दि.१० रोजी दुचाकी दुरुस्त करण्यासाठी गडचांदूर येथे गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. नातेवाईक व मित्रपरिवाराने त्याचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे रविवारी त्याच्या बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती.
दरम्यान, सोमवारी दि.१२ सकाळच्या सुमारास गडचांदूर परिसरातील रेल्वे रूळाजवळ एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी गडचांदूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह गोपाळ धोटे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे कढोली खुर्द व परिसरात शोककळा पसरली असून युवकाच्या मृत्यूमागील सत्य लवकरात लवकर समोर यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गडचांदूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



