“उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष” पुरस्काराने किशोर कारंजेकर सन्मानित
महाराष्ट्र शासन, व्हॉईस ऑफ मीडिया व शेठ ब्रिजमोहन लढ्ढा प्रतिष्ठानचा दिमाखदार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : – मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र शासन, व्हॉईस ऑफ मीडिया व शेठ ब्रिजमोहन लढ्ढा प्रतिष्ठान द्वारा आयोजित सन्मान सोहळ्यात महाराष्ट्रातून “उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष” पुरस्काराने व्हॉईस ऑफ मीडियाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष किशोर कारंजेकर यांना सोमवारी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रमुख अतिथी म्हणून युवा सेनेचे आदित्य ठाकरे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे आरोग्य दूत ओमप्रकाश शेटे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हसके पाटील, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, चंद्रमोहन पुप्पाला आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र भुषण पुरस्कारासह पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड देखील प्रदान करण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धूरा सांभाळताच किशोर कारंजेकर यांनी जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठी फळी उभी केली. यासोबतच पत्रकारांच्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान साखळी उपोषण देखील केले. पत्रकार दिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा सोहळा जिल्ह्यात पार पडला. पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करीत पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्डसह आभा कार्डचे वितरण करण्यात आले. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत त्यांना “उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष” पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, साप्ताहिक विंगचे उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, जिल्हा प्रवक्ता संजय धोंगडे, सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे, देवळी तालुका अध्यक्ष गणेश शेंडे, आशिष धापूडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
माझ्या एकट्याचा नाही तर हा सगळ्यांचा सन्मान – किशोर कारंजेकर
व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष, विभागीय उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, साप्ताहिक विंगचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व सदस्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे काम केले. त्या पदाधिकारी व सदस्यांचा देखील या पुरस्कारात खारीचा वाटा आहे. त्यांच्या योगदानामुळेच आज मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो. अशी प्रतिक्रिया याप्रसंगी किशोर कारंजेकर यांनी व्यक्त केली.