ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा लालगुडा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मना वरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी उपक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

       या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थाची विक्री, खरेदी आणि विविध पदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.

      यावेळी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवहारात आणि व्यवसायात कसा करावा या विषयावर शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या बाल आनंद मेळाव्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. व्यापार आणि व्यवसाय कसा करावा, खाद्यपदार्थाची विक्री कशी करावी, व्यवसायातून आपल्याला नफा तोटा कसा होतो , याबद्दल प्रात्यक्षिक मार्गदर्शन शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी केले. या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी मनमुराद आनंद घेतला. पालकांनीही तेथील खाद्यपदार्थांची रीतसर खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद वाढवला.

       या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे, उपाध्यक्ष वर्षा कोडापे,सदस्य लक्ष्मण कोडापे, गणेश कोडापे, भिकाजी सिडाम, अमावस्या तोडासे, आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये