ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांग व्यक्ती, मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्यांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार!

मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांचे प्रतिपादन 

चांदा ब्लास्ट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न 

चंद्रपूर : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात दिव्यांग व्यक्ती, मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.मानसिक आजार किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे त्यांना कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे कठीण जावु शकते.तेव्हा अशा समस्या ग्रस्त व्यक्तींच्या हक्कांचे संवर्धन झाले पाहिजे. त्यांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी केले.

     मानसिक आजार व बौद्धिक अक्षमतेने ग्रस्त असणाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ‘ राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींना कायदेशीर सेवा) योजना २०२४ ‘ या विषयावर मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे बोलत होते.

   चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्री साई मतिमंद शिक्षण संस्था संचलित स्विकार, दुर्बल मनस्क (मतिमंद) मुला-मुलींची निवासी शाळा,धिरजग्राम,मोरवा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अॅड विनोद बोरसे हे बोलत होते.

  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमती रेखाताई पिंपळशेंडे या उपस्थित होत्या.

      अॅड विनोद बोरसे यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे सांगितले की, मानसिक आजार आणि बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींच्या विशिष्ट कायदेशीर आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या दिवाणी, फौजदारी व प्रशासकीय किंवा त्यासंबंधी बाबींसाठी कायदेशीर सेवेची आवश्यकता वाटल्यास,त्या व्यक्तींना विविध योजना, कार्यक्रम, सुविधा किंवा सेवांमध्ये समान प्रवेश मिळणे साठी, त्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि बौद्धिक क्षमतांचा विचार करून, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे, योजना, धोरण राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची तरतूद या योजनेत केली आहे अशी महत्वपूर्ण माहिती यावेळी अॅड विनोद बोरसे यांनी उपस्थितांना दिली.

        मानसिक आजार आणि बौद्धिक अक्षमता असलेल्यांना कित्येकदा त्यांचे हिताचे निर्णय घेताना कायदेशीर अडचणी आल्यास अगर त्यांच्यासंबंधी कायदेशीर गुंतागुंत हाताळण्यास मदत होणेसाठी त्यांना गरजेनुसार व प्रकरण परत्वे कायदेशीर प्रतिनिधीत्व मिळणेसाठी गरजुंनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मोफत विधी सेवा मिळणेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन देखील अॅड विनोद बोरसे यांनी यावेळी केले.

     महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचेकडील निर्देशांनुसार समान किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अभय लाहोटी यांच्या आदेशाने व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सुधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सदर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये