ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

के. पी. सी. एल. बरांज कोळसा खाणीत झाडांची बेकायदेशीर कत्तल : लाकूड चोरीचा प्रयत्न उधळला

सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे पाच जण ताब्यात : ट्रॅक्टर, कटर मशीनसह ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             भद्रावती परिसरातील बरांज तांडा येथील ‘केपीसीएल’ (KPCL) कोळसा खाण क्षेत्रात प्रदूषण नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड करून लाकूड चोरी करण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ट्रॅक्टर, कटर मशीन, कुऱ्हाडी व लाकूड असा सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बरांज कोळसा खाण परिसरात कोळसा उत्खननामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कंपनीच्या जागेत सुमारे दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. ही झाडे आता १५ ते २० फुटांपर्यंत वाढली आहेत. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जुन्या डंपिंग परिसरात काही व्यक्ती झाडे तोडून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती सुरक्षा विभागाला मिळाली.

माहिती मिळताच सुरक्षा अधिकारी जनार्दन यशवंत कामडे यांनी अन्य सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संशयित व्यक्ती स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये तोडलेले लाकूड भरत असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टरसोबत ट्रॉलीही होती. संशयितांकडून झाडे तोडण्यासाठी वापरण्यात आलेली दोन कटर मशीन व तीन कुऱ्हाडी जप्त करण्यात आल्या.

चौकशीदरम्यान संबंधितांनी लाकूड तोडण्यासाठी तसेच झाडे तोडून नेण्यासाठी ट्रॅक्टर आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत पाचही जणांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी राजू शंकर कोतुलवार (रा. चालबर्डी), प्रदीप प्रभाकर कोसरे (रा. पिपरबोडी), दिलीप विठ्ठल जिवतोडे (रा. घोटणीबाळा, ता. भद्रावती), आनंदरााव आबाजी भोयर (रा. ब्रह्मपुरी), योगेश आनंदरााव मेघाम आणि मिथुन ताराचंद भोयर यांच्याविरुद्ध भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे ४ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, २० हजार रुपयांचे लाकूड आणि १० हजार ३०० रुपयांची हत्यारे, असा एकूण ४ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाणे प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष खाडे भद्रावती पोलिस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.

वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाने लावलेल्या झाडांची सर्रास तोड होत असल्याने या घटनेमुळे खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये