ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घुग्घूस पोलिसांचा पुढाकार

२ सप्टेंबरला शांतता समितीची बैठक

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर : आगामी गणेशोत्सव शांततामय व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी घुग्घूस पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता घुग्घूस पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवादरम्यान प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये योग्य समन्वय साधणे, उत्सवाच्या आयोजनासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे.

या बैठकीस सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक व मालक, मूर्तिकार बंधू, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पत्रकार तसेच सामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन घुग्घूस पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीस प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये चंद्रपूर तहसीलदार, चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, घुग्घूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, विद्युत नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी यांचा समावेश आहे.

बैठकीदरम्यान गणेशोत्सवाच्या काळातील डीजे व ध्वनिप्रदूषण, गणेशमूर्ती स्थापना व विसर्जन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वीज व्यवस्था आणि सार्वजनिक शांतता यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी व गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सव सर्वांच्या सहकार्याने शांततामय, सुरक्षित आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पडावा, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन घुग्घूस पोलिसांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये