अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचतगटांना देण्याची मागणी
मागणी मान्य न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट पुर्वी महिला बचत गटांना देण्यात येत होते मात्र यंदा पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील जस्ट नामक कंपनीला देण्यात आले. ह्यामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांना मिळणारे काम बंद झाले असुन त्यामुळे बचत गटातील महिलांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सदर कंत्राट महिला बचत गटांना देण्यात यावे ह्या प्रमुख मागणीसाठी बचत गटांच्या महिलांनी आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यात जवळपास 500 पेक्षा जास्त महिला बचतगट आहेत. ह्या गटांच्या माध्यमातून जिह्यातील 5000 महिलांना रोजगार मिळतो. ह्या पैकी बऱ्याच महिला बचतगटांना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठा करण्याचा अनुभव आहे त्याचप्रमाणे बचत गटांनी पोषण आहार तयार करण्यासाठी मशिनरी सुद्धा खरेदी केल्या असुन पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राट जस्ट कंपनीला दिल्यामुळे बचत गटांना मशिनरी खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येत आहे.
जिल्ह्यातील महिला बचत गटाकडे गोदाम व वाहतुक व्यवस्था तसेच मनुष्य बळ असल्यामुळे त्या पुरवठयाच्या कामाचा अनुभव देखिल असल्याने स्थानिक महिलांना बेरोजगार करून बाहेरील कंपनीला कंत्राट दिल्याने जिल्ह्यातील महिला पुरवठ्याचे कार्य करण्यास सक्षम असूनही त्यांना बेरोजगार करण्यात येत आहे हा महिलांवर अन्याय असुन ह्या बचत गटांना सदर कामाचे कंत्राट देण्यात न आल्यास महिला बचतगटांच्या सदस्य उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
महिला बचत गट संघटनेने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राट देण्यासह तालुकानिहाय कंत्राट पुरवठा निविदा जारी करण्यात याव्या त्याचप्रमाणे जस्ट कंपनीला देण्यात आलेले काम महिला बचत गटांना देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.