ताज्या घडामोडी

सहानुभूतीच्या लाटेवर होऊन स्वार, होईल का प्रतिभाची नौका पार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा निर्णायक वळणावर येऊन ठेपला असुन अवघ्या आठवडाभरात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनता आपला नवा प्रतिनिधी दिल्लीला पाठविण्यासाठी सज्ज झालेला आहे मात्र अजुनही बऱ्याच मतदारांनी आपला भावी खासदार कोण होणार ह्याचा निर्णय घेतला नसुन उर्वरित काळात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा मतदारांवर कसा आणि काय प्रभाव पडतो ह्यावर भाजपा, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्यांच्यासह इतर लहानमोठे पक्ष व अपक्ष उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल मात्र चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात खरी लढत भाजपचे सुधिर मुनगंटीवार व काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्यांच्यात होणार हे उमेदवारी जाहिर होताच स्पष्ट झाले आहे.

जाहीरपणे कुठलीही खळबळ, विरोध अथवा गटबाजी न होता जगातील सर्वात मोठा पक्ष असे बिरूद लावुन मिरविणाऱ्या भाजपने राज्याचे मंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांना उमेदवारी जाहीर केली. वास्तविक बघता मागील तीन निवडणुकीत विजय प्राप्त करून हॅटट्रिक साधणारे व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे सुद्धा यंदाही उमेदवारीचे दावेदार होते. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद असुन मागील पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवला आहे. मात्र पक्षाने सुधिर मुनगंटीवारांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उघडपणे त्यांनी कुठलीही नकारात्मक अथवा विरोध दर्शविणारी प्रतिक्रिया दिली नाही ह्याउलट काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून जणु रणकंदन माजले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निर्णय घेण्यास असमर्थ ठरल्याने थेट दिल्ली दरबारी तिकिटाचा वाद पोहचला. राष्ट्रीय स्तरावरून देखिल निर्णय होण्यास विलंब लागत होता धानोरकर व वडेट्टीवार असे दोन्ही तिकीट इच्छुक गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे ठाकले होते. केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केली मात्र पहिल्या फेरीचे मतदान असुनही चंद्रपूरच्या जागेवर निर्णय घेतला गेला नव्हता.

दरम्यान शिवानी वडेट्टीवार व प्रतिस्पर्धी प्रतिभा धानोरकर ह्या दोघीही दिल्लीत ठाण मांडून बसल्या. दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे तसेच आरोपांच्या फैरी झडत होत्या मात्र तरीही उमेदवारीचा पेच कायम होता. आपल्या मुलीला पाठबळ देऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरसंधान करण्याच्या प्रयत्नात होते. पक्षातील कुणीही उमेदवारी मागु शकतो असा युक्तिवाद त्यांनीं केला होता तर दुसरीकडे पक्षाचा निर्णय होत नसल्याने प्रतिभा धानोरकरांनी थेट शरद पवारांचा आधार घेतला व त्यांच्या करवी दबावतंत्र वापरणे सुरू केले. अखेरीस प्रतिभा धानोरकर ह्यांना पक्षाने राजस्थान मधील दोन उमेदवारांसह यादीत सामील करून केवळ तिन नावांच्या विशेष यादीत स्थान देऊन उमेदवारी जाहिर केली.

प्रतिभा धानोरकर सहानुभूती व जात ह्या दोन मुद्यांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट होते. स्व. बाळु धानोरकर काँग्रेस मधे येऊन उमेदवार झाल्यानंतर त्यांनीही जातीच्या आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करून विजय मिळविला होता ह्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या प्रतिभा धानोरकर ह्यांना हा मुद्दा पुढे रेटणे सोपे होते. ह्याशिवाय त्यांनी मतदारांची सहानुभूती मिळावी ह्यासाठी देखिल रणनीती आखुन ठेवली होती.

तिकिटाच्या वादात स्व. खा. बाळु धानोरकर ह्यांची पत्नी असल्याने आपला ह्या जागेवर नैसर्गिक हक्क असल्याचे सांगुन आपल्या पतीचा जीव पक्षांतर्गत कुरघोड्यामुळे झाला असल्याचा आरोप करताना दुसरा मृत्यु होणार नाही ह्याची आपण काळजी घेणार असल्याचे सांगुन सहानुभूती मिळवण्याचा पहिला डाव टाकला.

हा पहिला डाव केवळ मतदारांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी होता असे नव्हे तर पक्षाच्या परंपरेप्रमाणे पदारुढ लोकप्रतिनिधींच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला तिकीट देण्याची काँग्रेस पक्षात परंपरा असल्याचे माध्यमांत विधान करून त्यांनी पक्ष नेतृत्वावर प्राथमिक दबाव निर्माण केला. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाला चंद्रपूरच्या जागेवरच विजय मिळाला असल्याने स्व. बाळु धानोरकर ह्यांचे सोनिया व राहुल गांधी ह्यांचेशी चांगले संबंध होते. अर्थातच ह्या संबंधांचा खुबीने वापर करून घेण्याचे धोरण प्रतिभा धानोरकर ह्यांनी आखुन तिकीट मिळविण्यात यश प्राप्त केले.

सहानुभूतीच्या राजकारणाचा दुसरा अंक तिकीट जाहीर झाल्यानंतर लगेच सुरू झाला. उमेदवारी घेऊन नागपुर विमानतळावर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले त्यावेळी डोळ्यात अश्रुधारा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. अर्थातच नेत्याच्या डोळ्यातील अश्रुधारा बघुन कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य मतदारही हेलावले व प्रतिभा धानोरकरांना हवा तो परिणाम साधला गेला.

ह्या अश्रुंबाबत विरोधी उमेदवाराने प्रतिक्रिया देताच महिलेचा त्यातल्यात्यात विधवेचा अपमान, तिच्या अश्रुंचा अनादर अशा प्रकारच्या विधानांनी सहानुभूतीत भर टाकली. प्रतिभा धानोरकर ह्यांची वाटचाल सहानुभूती व जात ह्या दोन मुद्यांवर सुरू असल्याचे दिसत असुन ग्रामीण भागातील मतदार बऱ्या प्रमाणात त्यांच्याकडे झुकला असल्याचे जाणवत होते.

निवडणुक भलत्याच दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे विरोधी उमेदवाराला लक्षात येताच त्यांनी मतदारांचे लक्ष पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्याकडे आणण्याचे प्रयत्न सुरू केले असुन दोन्ही प्रमुख उमेदवार विद्यमान आमदार असल्याने कुणी आपल्या मतदारसंघात काय कार्य केले, किती विकास केला ह्याबाबत मतदारांना अवगत करणे, आपल्या क्षमता मतदारांना दाखवुन देणे आवश्यक असताना जात व सहानुभूती ह्याकडेच लक्ष केंद्रित केल्या जात आहे हे विशेष.

प्रतिभा धानोरकरांना घेरण्यासाठी सुधिर मुनगंटीवार ह्यांनी आपण 300 विकास कामे केली ह्यांनी 21 तरी दाखवावी असे आव्हान केले असले तरीही प्रतिभा धानोरकर ह्यांनी मागील चार वर्ष घरातच खासदार व आमदार अशी दोन्ही पदे असुनही वरोरा भद्रावती क्षेत्रात नजरेत भरण्यासारखे कोणते मोठे विकासाचे काम केले किंवा कोणत्या योजना राबविल्या हे अद्यापही सांगितले नसल्याने सहानुभूतीच्या लाटेवर होऊन स्वार, होईल का प्रतिभाची नौका पार असा प्रश्न मतदारांसह राजकीय अभ्यासकांना पडला आहे हे निश्चित.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये