हायकोर्टाकडून तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे निलंबन खारीज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शेतीच्या फेरफार प्रकरणात एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येच्या केलेल्या प्रयत्नावरून महाराष्ट्र शासनाने भद्रावती येथील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना दोषी ठरवून निलंबित केले. या निलंबनाचे विरोधात दोघांनी नागपूर हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांचे म्हणणे ऐकून निलंबन खारीज केले.
कुरोडा येथील शेत जमिनी संदर्भात केलेल्या फेरफार प्रकरणात तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे हे मुद्दामून आपल्याला त्रास देत असल्याचे सांगून शेतकरी परमेश मेश्राम यांनी दि.२६ सप्टेंबरला तहसीलदार यांच्या कक्षासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ११ दिवसानंतर या शेतकऱ्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणासंदर्भात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असा निष्कर्ष काढून महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबरला एका आदेशान्वये निलंबित केले. या विरोधात दोघांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने सदर प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांचे बाजूने निकाल दिला आणि त्यांचे निलंबन रद्द केले. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधिर खांडरे यांचे विरोधातील जन भावना लक्षात घेता त्यांची पुनर्नियुक्ती भद्रावती तहसील कार्यालया करण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.