अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा !
भाजपा शिष्टमंडळाचे पोलिसांना निवेदनाद्वारे आवाहन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरात नुकत्याच मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीकडून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. या घटनेमुळे शहरात अमली पदार्थांची विक्री व सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युवकांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर अंकुश आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर जिल्हा तर्फे माजीं पालकमंत्री मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे आज जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. एम. सुदर्शन यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात अमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत –
संशयित ठिकाणी पोलिसांचे विशेष छापे आणि सतत गस्त.
शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम.
पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना.
गुन्हेगारांवर कठोर शिक्षा आणि द्रुतगती न्यायप्रक्रिया.
युवकांना क्रीडा आणि संस्कारवर्धन उपक्रमांकडे वळविण्याची मोहीम.
या निवेदनादरम्यान डॉ. मंगेश गुलवाडे महामंत्री, भारतीय जनता पक्ष – जिल्हा चंद्रपूर यांच्यासह विशाल निंबाळकर, मनोज सिंघवी, यश बांगडे, गणेश रामगुंडेवार, उमेश आष्टणकर आणि अमित निरंजने, मनिष खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला आवाहन केले की, चंद्रपूरमधील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजातून अमली पदार्थांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी.
“अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा!” हे फक्त घोषवाक्य नसून, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे या वेळी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले.