ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कूल कनेक्ट संपर्क अभियानातून ‘एनईपी’ ची जनजागृती

चंद्रपूर जिल्ह्यात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सर्वदूर सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने “स्कूल कनेक्ट” (एनईपी कनेक्ट) हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यासाठी शासनाने राज्यातील विद्यापीठांना सुचित केले आहे. याच अनुषंगाने हे अभियान राबविण्यासाठी व विद्यार्थ्यांना याविषयी ज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईने पुढाकार घेतला आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात “स्कूल कनेक्ट” (NEP कनेक्ट) संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारा तर्फे या माध्यमातून एनईपी विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

या अभियानाला जिल्ह्यातील शाळांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हे अभियान चंद्रपूर जिल्हयातील शहरी भागासोबतच अतिशय दुर्गम तालुक्यातील यामध्ये गडचांदूर, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपींपरी, बल्लारपूर आणि चंद्रपूर मधील ३५ कनिष्ठ महाविद्यालयांत राबविण्यात आले आहे. ज्यामध्ये ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित सर्व शिक्षक आणि प्राध्यापक यांनाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिनामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी विद्यापीठाच्या प्रशिक्षित चमूने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला,सादरीकरण केले. यातून खऱ्या अर्थाने एनईपी मधील अनेक घटकांविषयी चर्चा झाली. यावेळी एनईपी संदर्भातील अनेक शंकांचे निरसन करण्याचे कामही केले गेले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भाने हे नाविन्यपूर्ण स्कूल कनेक्ट संपर्क अभियान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनात पार पडले असून यात बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या नेतृत्वात, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त, प्रा. खुशबू जोसेफ, नेहा गिरडकर, अश्विनी वाणी, श्रुतिका राऊत आणि शीतल बिल्लोरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी स्नेहा लोहे, ममता भेंडे, आशिष नुगुरवार, वैशाली बोमकंटीवार यांनी परिश्रम घेतले.

स्कूल कनेक्ट अभियानाची वैशिष्ट्ये

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे. विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती देणे. मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे. शिक्षण अर्धवट सोडून रोजगाराकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त दूरस्थ शिक्षणाच्या संधींविषयी माहिती देणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे. विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती देणे. विद्यापीठाच्या विद्यार्थी सहायता कक्षाविषयी माहिती देणे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींविषयी माहिती देणे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये