आशा स्वयंसेविकाची नियमबाह्य पध्दतीने निवड
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे दिनांक ०३ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या मुलाखतीत आशा स्वयंसेविकाची नियमबाह्य पद्धतीने निवड करण्यात आल्याचा आक्षेप घेत वर्षा दयानंद राठोड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे आक्षेप अर्ज करून उच्चस्तरीय समिती नेमून नव्याने मंजूर आशा स्वंयसेविका पदाकरीता घेतलेल्या मुलाखतीची चौकशी करून फेर मुलाखत घेण्याबाबत मागणी केली आहे.
तालुक्यातील झानेरी, मालगुडा व वणी खुर्द येथील नव्याने मंजूर आशा स्वंयसेविका पदाकरीता काही निकष निश्चित करून इच्छुक उमेदवाराकडून लावलेल्या जाहीरनाम्यातील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे ११ डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात आले होते. दिनांक ०३ जानेवारी २०२४ ला मुलाखत घेण्यात आली.
मुलाखतीत प्रति उमेदवारांना फक्त ४ प्रश्न सारखेच विचारण्यात आले. मुलाखत दिलेला उमेदवार बाहेर आल्यावर सर्वांना सांगायचा त्यामुळे कॉपी झालेली आहे. जाहीरनाम्यानुसार उच्च शिक्षीत व आरोग्य सखी यांना प्राधान्य असुन देखील उच्च शिक्षीतांना व आरोग्य सखीचे अनुभव प्रमाणपत्र असणाऱ्यांना डावलून झानेरी, मालगुडा व वणी खुर्द येथील तिसऱ्या क्रमांकावर मुलाखतीस बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांचीच नियमबाह्य निवड करण्यात आली असल्याचा आक्षेप जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केलेल्या आक्षेप अर्जात घेण्यात आला आहे.
निवड प्रक्रियेतील अधिकारी निवड प्रक्रियेत असा भोंगळ कारभार करत असतील तर गोर गरिबांच्या शिक्षणाला अर्थ काय ? असा सवाल उपस्थित करत चौकशी करून दोषींवर शासन करावे व उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून फेर मुलाखत घेण्यात यावी अशी मागणी आशा स्वयंसेविका पदाकरीता अर्ज केलेल्या उच्च शिक्षित उमेदवारांसह दयानंद राठोड, मुकेश चव्हाण, सुरेश आडे, देविदास पवार इत्यादीनी केली आहे.