इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये पोळा सण उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये पोळा सण धार्मिक भक्तीभावाने आणि आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्याध्यापिका पायल कोम्मुरु यांच्या हस्ते नंदीची मूर्तीची पूजा करून झाली.
इयत्ता ८ च्या विद्यार्थी सरस फुलझेले यांनी पोळा सणाचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी त्याचे नाते सांगितले. इयत्ता ८ आणि ९ च्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित एक हृदयस्पर्शी नाट्य सादर केले, ज्यात हवामान बदल आणि कर्जबाजारीपणाचे चित्रण होते.
संगीत शिक्षक लोभेश पिल्लेवार यांनी पोळा सणाशी संबंधित एक भावपूर्ण गीत सादर केले.
यानंतर नंदी सजावट स्पर्धा घेण्यात आली, ज्यात प्री-प्रायमरी आणि प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात सजवलेले लाकडी नंदी सादर केले. परीक्षकांनी मूल्यांकन करून विजेते घोषित केले.
राखी बनवण्याची स्पर्धा, निबंध लेखन, जेसीआय डान्सिंग स्टार स्पर्धा आणि देशभक्तीपर गीत स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती होती.