Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोहयो विहीर बांधकामाची रक्कम अडकली

शेतकऱ्यांची पंचायत समितीला धडक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 बांधकामाची रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

     मागेल त्याला सिंचन विहीर ही वैयक्तिक योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने योजना राबविली जाते. सदर योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील 3-4 महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विहीर बांधकामाची रक्कम मिळावी ही मागणी घेऊन शेतकऱ्यांनी पंचायत समिती गाठली. गटविकास अधिकारी नसल्याने मागणीचे निवेदन अधीक्षक यांना दिले व रक्कम लवकर न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला.

    शेतीला सिंचनाची सोय व्हावी, गावातील मजुरांना गावातच काम मिळावा या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी चार लक्ष रुपये किंमतीची सिंचन विहीर बांधकामाची योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु आहे. सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. सावली तालुक्यात 139 विहिरीचे बांधकाम जानेवारी ते मे या कालावधीत झाले. या योजनेंतर्गत अकुशलचे अनुदान मजुरांच्या खात्यात तर कुशलची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. एकूण चार लाख अनुदानापैकी मजुरी 1लाख 47 हजार तर उर्वरित रक्कम साहित्यासाठी दिल्या जाते. सिंचन विहिरीचे अनुदान सरळ बँक खात्यात शासनाकडून जमा केल्या जाते. विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर अकुशल मजुरीची रक्कम काहींच्या खात्यात जमा झाली तर काही मजुराना काहीच मिळाले नाही. साहित्याची रक्कम तर काहीच मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडील रक्कम खर्च करून, साहित्य उधारीवर घेऊन विहिरीचे बांधकाम केले. मात्र ही अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचायत समिती गाठली मात्र गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याने मागण्यांचे निवेदन कक्ष अधिकारी यांना दिले. यावेळी खोवाजी भोयर, भय्याजी बोरकुटे, गुणाजी पाल, रोहिदास मेंदाळे, चंद्रशेखर गेडाम, हेमाजी घोगरे, देवाजी वाढणकर, ताराचंद रामटेके, नूतन नागपुरे, शरद घोटेकर, अरविंद काटकर, वामन भोपये, रमेश वरगंटीवार, सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

     एकीकडे शासन शेतकऱ्यांचे, मजुरांचे पैसे देत नाही आणि दुसरीकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राबविते. ते पैसे कुठून देणार. साहित्याची उधारी द्यायची आहे, मजुरांचे पैसे द्यायचे आहे, शेती करायची आहे तर कसा प्रपंच चालवायचा हा प्रश्न पडला आहे.

           वामन भोपये, लाभार्थी तथा सदस्य ग्रा. पं. हिरापूर

    मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम लाभार्थ्यांनी पूर्ण केलेला असून लाभाची रक्कम लाभधारकांना प्राप्त झालेली नाही. पंचायत समिती स्तरावरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून पुढील १० ते १५ दिवसात संपूर्ण रक्कम लाभधारकांच्या खात्यात जमा होईल.

         मधुकर वासनिक,संवर्ग विकास अधिकारी पं.सं. सावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये