भद्रावतीत भीषण अपघात
टाटा एस डग्गाची दुचाकीला धडक : एकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील जमगट टर्निंग पॉईंटजवळ आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा एस डग्गा या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद गुलाम रसूल शेख (वय ४२, रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती) असे आहे. ते मेस व्यवसायाशी संबंधित असून नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दुचाकी (एमएच ३४ व्ही ७३५०) ने एमटा कर्नाटक पावर लिमिटेड येथे डबे पोहोचवून परत येत असताना हा अपघात झाला. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून मृतकाचा आज चौथा रोजा होता. कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
अपघातात दुचाकीस्वार जागीच गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे हलविले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये टाटा एस डग्गा वाहनाने धडक दिल्याचे स्पष्ट दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अकबर पठाण करीत असून बातमी लिहीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. मानोरा फाट्यावर अपघातांचे सत्र दरम्यान, मानोरा फाट्याजवळ अपघातांची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वी, १७ फेब्रुवारी रोजी वाहनाच्या धडकेत दत्ता गोविंद खंडारे या मजुराचा मृत्यू झाला होता. तसेच एका कारचालकाचा रस्त्याच्या कडेला खड्यात वाहन गेल्याने अपघात झाला होता.
या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



