वर्धा नदीत वाहून गेलेल्या रापटप्रकरणी वेकोलीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट
वर्धा नदीच्या मुंगोली पुलालगत वेकोलीने बांधलेला तात्पुरता रापट पावसामुळे नदीच्या प्रवाहात पूर्णतः वाहून गेला. या प्रकारामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घुग्घुस शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जबाबदार वेकोली अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, वर्धा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था जीर्ण झाल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर नदीच्या पात्रात वेकोलीने सिमेंटचे होम पाईप टाकून त्यावर माती टाकून तात्पुरता रापट तयार केला होता, ज्यावरून कोळशाची वाहतूक सुरू होती. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळोवेळी यासंदर्भात संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनासह संबंधित यंत्रणांकडे निवेदन दिले होते. तरीदेखील वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
या दुर्लक्षामुळेच अखेर पावसाने नदीच्या प्रवाहात रापट वाहून गेला. त्यात माती आणि कोळशाची धूळ नदीच्या पाण्यात मिसळून प्रदूषणात वाढ झाली आहे. पिट्टलवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, नदीच्या पाण्यातील प्रदूषण त्वरित कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची विनंतीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.