ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचार करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा टीबी फोरम समितीचा आढावा

चांदा ब्लास्ट

क्षयरोग दूर करण्यासाठी समाजात असलेले क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व या रोगाचा संसर्ग कमी करणे हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचाराखाली आणावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

जिल्हा टिबी फोरम समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. वीस कलमी सभागृहात आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांना शोधून त्यांचे निदान करण्यासाठी तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून बरे करावे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिम जिल्हयामध्ये २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील १०० टक्के आणि शहरी भागातील २० टक्के लोकसंख्येची तपासणी घरोघरी जाऊन आरोग्य चमुमार्फत करण्यात येणार आहे. आरोग्य चमू घरी आल्यास नागरीकांनी कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण तपासणीसाठी सहकार्य करावे तसेच निदान करून उपचार घ्यावेत.

टीबी फोरम समितीचे उद्देश:

लोकसहभागातून व क्षयरुग्णांच्या दृष्टीकोनातून क्षयरोग प्रतिसाद मजबूत करणे, क्षयरोगाने ग्रस्त लोकांचे नेटवर्क बनवुन त्यांच्या माध्यमातून टिबी कार्यक्रमात समुदायांचा सहभाग वाढविणे, क्षयरोगाप्रती समाजामध्ये भेदभाव दूर करणे व त्यांना शासकीय सोयी व सेवा उपलब्ध करून देणे तसेच समाजामधून क्षयरोगाचे दूरीकरण करून समाज क्षयमुक्त करणे हा टीबी फोरम समितीचा उद्देश आहे.

संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेची अंमलबजावणी :

जिल्ह्यातील १८ लक्ष ३४ हजार २४५ लोकांची तपासणी १ हजार ५१३ चमूमार्फत २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून अभियानास सहकार्य करावे. लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी. निदान झाल्यास क्षयरोगावर संपूर्ण औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

क्षयरोगाची लक्षणे :

दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला व ताप, वजनामध्ये लक्षणीय घट, मानेवर गाठ, थुंकीद्वारे रक्त जाणे, सायंकाळी ताप येणे व रात्रीला हातापायाला घाम येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहे. संपूर्ण औषधोपचार केल्यावरच या रोगाचा संसर्ग कमी होऊ शकतो व रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

निक्षय मित्र बनून मदत करण्याचे आवाहन :

क्षयरुग्ण औषधोपचार घेत असतांना त्यास योग्य तो पुरक पोषण आहार मिळावा, तो क्षयमुक्त व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था अथवा दानशूर व्यक्तीने एका क्षयरुग्णास दर महिन्याला एक याप्रमाणे ६ महिन्याकरीता फुड बास्केट (न्युट्रीशन किट) देवून निक्षय मित्र बनून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फुड बास्केटमध्ये तांदूळ/गहू ३ किलो, तूरडाळ दीड किलो, शेंगदाणे १ किलो खाण्याचे तेल १ लिटर, याव्यतिरिक्त ऐच्छिकरीत्या चणाडाळ, मुगडाळ, मोट, मसूर, बरबटी, राजमा, सोयाबीन वडी, शेंगदाणा व राजगिरा चिक्की, खजूर व कणिक आदी साहित्य देऊन क्षयरुग्णास सहाय्य करू शकता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये