ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षेनुसार वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न करा

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची सूचना

चांदा ब्लास्ट

मुंबईसह राज्याची वीज मागणी ३१ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. आर्थिक विकासामुळे लोकांचे राहणीमान सुधारत असून ही मागणी आगामी काळात ३५ ते ४० हजार मेगावॅटवर पोहोचेल. त्यामुळे वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षेनुसार दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत, अशी सूचना एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी चंद्रपूर येथे गुरुवारी केली.

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व महाऊर्जा या सरकारी कंपन्यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहीर, मा. आ. किशोर जोरगेवार, महानिर्मितीचे संचालक संजय मारूडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता गिरिश कुमारवार, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे उपस्थित होते.

मा. विश्वास पाठक यांनी सांगितले की, आर्थिक विकासामुळे लोकांचे राहणीमान उंचावत आहे व त्यासोबत विजेची मागणी वाढत आहे. त्यानुसार ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षेनुसार दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी निर्मितीची क्षमता वाढविणे, पारेषण जाळे सुधारणे आणि वितरण व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे.

ते म्हणाले की, काळाची पावले ओळखून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या पाठबळाने वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी ४२,००० कोटी रुपयांची आरडीएसएस ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात २१०० कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यावर भर दिला आहे. ही योजना गेम चेंजर ठरणार आहे.

चंद्रपूर शहरातील मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी वापरण्याच्या प्रकल्पावर भर देण्याची सूचना त्यांनी केली. जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणात वीज सोडण्यामुळे अपघात होऊन काहींचा बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक आहे. विद्युत अपघात रोखण्यासाठी गावोगावी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

मा. हंसराज अहीर व मा. किशोर जोरगेवार यांनी वीज कंपन्यांकडून जनतेला सेवा मिळण्याबाबत सूचना केल्या. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी, असे मा. पाठक यांनी सांगितले.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सादरीकरण केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये