ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१०–१२ वर्षांपासून बसस्थानकाविना नकोडा

उद्योगांचे CSR कोट्यवधींमध्ये, पण नागरिक आजही रस्त्याच्या कडेला प्रतीक्षेत

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा गावात गेल्या तब्बल १० ते १२ वर्षांपासून बसस्थानकाची सुविधा नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकास, CSR आणि जनसेवेचे मोठमोठे दावे करणारे उद्योग आणि राजकीय नेते असतानाही गावातील नागरिकांना आजही उन्हात, पावसात आणि थंडीत रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.

गावातील विद्यार्थी, महिला, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालय, नोकरी तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी बस हेच मुख्य वाहतूक साधन असताना बसथांब्याची मूलभूत सुविधाही उपलब्ध नसणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, नकोडा परिसरात मोठ्या उद्योगांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. CSR निधीच्या नावाखाली विकासाचे दावे केले जातात, राजकीय व्यासपीठांवर घोषणा केल्या जातात; मात्र गावातील सर्वात मूलभूत प्रश्न — बसस्थानक — आजही दुर्लक्षितच आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की काँग्रेस, भाजप आणि इतर राजकीय पक्षांचे नेते गावात सातत्याने सक्रिय असतात, पण नागरिकांच्या प्रत्यक्ष अडचणी मात्र अद्याप कायम आहेत.

ग्रामस्थांनी सुरक्षा विषयक चिंताही व्यक्त केली आहे. बसथांबा नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला ओबी, रेती, माती आणि भंगार चोरीशी संबंधित संशयित व्यक्तींची नेहमीच वर्दळ असते. पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात राजकीय आणि औद्योगिक हितसंबंधांवरून नेहमीच “उंदीर-मांजराचा खेळ” सुरू असतो, मात्र सामान्य नागरिकांच्या सुविधांकडे कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही.

नकोडा परिसरात अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी Lloyds Metals and Energy Limited, ACC Limited तसेच Maharashtra State Road Transport Corporation यांनी सामाजिक उत्तरदायित्व आणि जनसेवेच्या भावनेतून पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

ग्रामस्थांची मागणी आहे की गावात आधुनिक सुविधांनी सुसज्ज डिजिटल बसस्थानक उभारण्यात यावे. त्यामध्ये स्वच्छतागृह, स्नानगृह, CCTV कॅमेरे, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, बसण्याची व्यवस्था आणि पुरेशी प्रकाशयोजना उपलब्ध करून द्यावी. उद्योग आणि प्रशासन खरोखरच विकासाचा दावा करत असतील, तर सर्वप्रथम नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, कोट्यवधी रुपयांच्या CSR आणि विकासाच्या दाव्यांमध्ये नकोडा गावाला एका साध्या बसस्थानकासाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार?

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये