ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘व्हाईट एश’ संघाला ‘चंद्रपूर प्रीमियर लीग सिझन १०’चे विजेतेपद

रविवारी मोहर्ली मार्व्हल्स संघाला ३२ धावांनी हरवून जिंकली चमचमती ट्रॉफी

चांदा ब्लास्ट

 वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, केंद्राचे जनसंपर्क अधिकारी राजूरकर, उपमुख्य अभियंता कुटेमाटे, सुप्रसिद्ध व्यावसायिक चंद्रकांत वासाडे, यांच्या हस्ते पार पडला पारितोषिक वितरण सोहळा.,

व्हाईट एश संघाच्या रवी जांगीड  याने पटकाविला स्पर्धावीर पुरस्कार त्यालाच मिळाला अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार चंद्रपूर प्रीमियर लीग सी.पी.एल. टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या पर्वाचे विजेतेपद डॉ. चेतन कुटेमाटे यांच्या व्हाईट एश संघाने पटकाविले. त्यांना १ लाख २५ हजार १११ रुपये रोख आणि चमचमती ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळेच्या मैदानावर या स्पर्धेत १६ संघांचे प्रत्येकी १५ खेळाडू असे एकूण २४० खेळाडू विजेतेपदासाठी झुंजले. सामन्यांसाठी अविश्रांत परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले होते. १० जाने. रोजी या क्रिकेट कार्निव्हलचा प्रारंभ झाला होता.  सुमारे १८ दिवस ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. रविवार २८ जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना व्हाईट एश विरुद्ध मोहर्ली मार्व्हल्स यांच्या संघात खेळला गेला. 

नाणेफेक जिंकून व्हाईट एश संघाने प्रथम फलंदाजी केली. यात त्यांनी निर्धारित २० ओव्हर्समध्ये ७ बाद १३८ धावा केल्या. उत्तरात मोहर्ली मार्व्हल्स संघ १८.३ ओव्हर्समध्ये केवळ ६ बाद १०६ धावा करू शकला. अशा रीतीने व्हाईट एश संघ ३२ धावानी विजेता तर मोहर्ली मार्व्हल्स संघाला उपविजेतेपद मिळाले.

पारितोषिक वितरण सोहळ्याला चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, केंद्राचे जनसंपर्क अधिकारी राजूरकर, उपमुख्य अभियंता कुटेमाटे, सुप्रसिद्ध व्यावसायिक चंद्रकांत वासाडे यांची उपस्थिती होती. मान्यवर अतिथींचा स्मृतिभेट देत सन्मान करण्यात आला. आपल्या संबोधनातून गिरीश कुमरवार यांनी सी.पी.एल. च्या आयोजनाचे कौतुक केले. चंद्रपूरच्या क्रिकेटपटूंनी सी.पी.एल.च्या मंचाद्वारे आपला खेळाचा स्तर सातत्याने उंचावत रहावा असे आवाहन त्यांनी केले. 

पुरस्कार वितरणाच्या प्रारंभी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या ग्राउंड स्टाफ, अंपायर, स्कोअरर हर्षल भगत आणि समालोचक मोंटू सिंग, कोमिल मडावी यांना सन्मानीत केले गेले. अंतिम सामन्याच्या सामनावीराचा मान व्हाईट एश संघाच्या रवी जांगीड यांना देण्यात आला. 

स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज पुरस्कार भद्रावती ग्रेनेड्सच्या स्पर्धेत एकूण २५३ धावा काढणाऱ्या कुशल पिंपळकर याला प्रदान करण्यात आला. स्पर्धेच्या सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार ताडोबा टायगर्स संघाच्या  प्रशिक लांडगे यांना देण्यात आला. स्पर्धेच्या सर्वोत्तम विकेट कीपरचा बहुमान ताडोबा टायगर्स संघाच्या शुभम निरगुडवार यांना मिळाला 

तर ५ झेल घेणाऱ्या मोहर्ली मार्व्हल्सच्या क्षितिज दहिया ने सर्वोत्तम फिल्डरचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्तम खेळी करणाऱ्या रवी जांगीड आणि तरुण ठाकरे यांना स्पर्धाविराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्पर्धेतील सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून ताडोबा टायगर्स संघाला पारितोषिक देत गौरविण्यात आले.  सी.पी.एल. दहाव्या पर्वात विजेते आणि उपविजेते चषक मिळाल्यानंतर मैदानावर एकच जल्लोष झाला.

स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, आशीष अम्बाडे कार्यरत होते. 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये