ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रंथाली प्रकाशित विजय बुक्कावार यांच्या ‘चिरंजीव भारत’ पुस्तकाचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट

विजय बुक्कावार यांच्या ‘चिरंजीव भारत’ पुस्तकाचे प्रकाशन वांद्रे येथील ग्रंथाली प्रतिभांगण येथे बुधवार दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना निळू दामले म्हणाले कि,

‘विविधता हे भारताचे वैशिष्टय आहे. इतकी विविधता असलेल्या भारतात माणसे एकत्रित राहतात. त्यांना जोडणारी अशी कोणती गोष्ट आहे. याचे मला राहून-राहून कुतुहूल वाटते.’ बुक्कावार यांचे हे पुस्तक इतिहासाचे संशोधन करत असताना साधनांचा शोध कसा घ्यावा. याचा परिपाठ देणारे आहे. धर्मेतिहासाचे त्यांना झालेले आकलन त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. पण त्याच बरोबरीने त्यांनी औद्योगिक सुरक्षितता क्षेत्रात आलेले अनुभव, आपलं जगणं शब्दबद्ध करावे, जे सर्वांना प्रेरणा देणारे असेल, अशा शब्दात निळू दामले यांनी आपले विचार व्यक्त केले.

या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पुस्तकाच्या अनुषंगाने खुली चर्चा करण्यात आली. विज्ञान मराठी परिषदेचे अ. पां. देशपांडे म्हणाले कि हे पुस्तक वाचताना मला महापोध्याय पा.वा. काणे यांच्या पुस्तकाची आठवण होते. आपल्या शिक्षण व्यवस्थेत इतिहास एकांगी पद्धतीने शिकवला जातो. इतिहास म्हणजे केवळ लढाया नव्हेत. तर त्या-त्या काळाचा इतिहास सामाजिक अंगानेदेखील शिकविला गेला पाहिजे,असे विचार देशपांडे यांनी मांडले. ‘चिरंजीव भारत’ पुस्तक इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिले गेले आहे कि ते संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल असे नंदकुमार महाजन म्हणाले.

तर बुक्कावार यांनी अत्यंत विचार करून लिहिलेले हे पुस्तक विचार करायला लावणारे आहे असे दिलीप लोथे म्हणाले. बुक्कावार यांनी अतिशय निर्भीडपणे पुस्तक लिहिले असून इतिहास जसा आहे तसा सांगितला आहे, असे  मुकुंद जोशी म्हणाले. डॉ. आनंद मुकेवार, सीए प्रवीण शिंदे, राजू इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या चर्चेत सहभागी झाली होती.

प्रस्तुत पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले. अश्विनी भोईर यांनी ग्रंथालीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संपादक अरुण जोशी व लेखिका सुधा तुंबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये