ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रावणदहन बंद करा

आदिवासी समाजाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यास माजरी परिसरातील आदिवासी समाज बांधवासह विविध गावातील सरपंच, ग्रा. पं. सदस्यांनी विरोध केला आहे. तर कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी वरोरा, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक, माजरीचे ठाणेदार यांच्याकडे केली आहे.

हजारो वर्षांपासून रावण दहनाची प्रथा सुरू आहे. सत्याचा असत्यावर विजय या अर्थाने दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. मात्र मागील वर्षीपासून आदिवासी समाजाने या प्रथेला विरोध करीत आहे. रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीत तज्ञ, राजनीतीज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता. इतके असताना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे, असे आदिवासी समाजाने म्हटले आहे.

रामायण आणि पुराणांमध्ये कुठेही रावणाचे चरित्र वाईट अर्थाने नोंदविलेले नाही. उलट ज्ञानी, संस्कृत पंडित, बलवान, न्यायी राजा असाच रावणाचा उल्लेख आढळतो. त्यामुळेच देशात काही ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत व आदिवासी समाज रावणाला आपला मोठा भाऊ मानतो. रावणदहन करणे म्हणजे बहुजन समाजाची भावना दुखावणे आहे. त्यामुळे ही प्रथा तातडीने बंद करावी व रावण दहन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान दशऱ्याच्या दिवशी रावण यांचा पुतळ्याचे दहन करणाऱ्या व्यक्तीवर व मंडळावर भादवि १८६० अंतर्गत कलम १५३, १५३(अ ), २९५, २९५(अ ), २८९ मुंबई पोलिस कायद्यानुसार १३०,१३४,१३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी समाजाचे संघटक तथा माजी पं. स. सदस्य चिंतामण आत्राम यांच्यासह आदिवासी समाज व अनुसूचित जनजातीच्या विविध संघटनेने निवेदनातून केली आहे.

वर्जन- उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी माजरी पोलीस स्टेशन येथे दोन्ही पक्षाची बैठक घेण्यात आली होती. दरम्यान दोन्ही पक्षांनी आप-आपली भूमिका मांडली. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बैठकीत निदर्शनात आले. दरम्यान सोमवारी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या दालनात दोन्ही पक्षाची बैठक लावण्यात आली. बैठकीत रावणाच्या पुतळ्याला न जाळता एक मुखी पुतळ्याचा दहन होणार. आणि त्या पुतळ्यामध्ये रावणाचा कुठलाही उल्लेख राहणार नाही असा निर्णय झाला.

– अजितसिंग देवरे, ठाणेदार माजरी

वर्जन – रावण दहन समितीकडून मागील तीस वर्षांपासून रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणे असा उद्देश नसून, “बुराई पर अच्छाई की जीत” या उद्देशाने पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.

– एम. पी. राव, अध्यक्ष -रावण दहन समिती

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये