Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

बावनकुळे ढाब्यावर या! डिजिटल मीडिया असोसिएशनचे आमंत्रण

पत्रकारांबद्दल असभ्य वक्तव्य करणाऱ्या बावनकुळे ह्यांना सद्बुद्धी द्या - संघटनेचे गणरायाला साकडे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्ते, ब्लॉक प्रमुख, पन्ना प्रमुख व पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना येणारा काळ निवडणुकीचा असल्यामुळे विधाने करताना काळजी घेण्याचा सल्ला देतानाच जर तुमच्याद्वारे काही चुकीचे वक्तव्य झाल्यास किंवा तुम्ही काही अयोग्य वागल्यास त्याची बातमी होऊ नये ह्यासाठी पत्रकारांशी कसे वागायचे ह्याबाबत सल्ला देताना त्यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे वक्तव्य करून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांचा सर्वत्र निषेध करण्यात येत असुन त्यांच्या बातम्या तसेच पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय अनेक ठिकाणच्या पत्रकारांनी घेतला आहे.

ह्याच अनुषंगाने चंद्रपूर येथेही बावनकुळे ह्यांच्या सर्व कार्यक्रमांवर चंद्रपुरात बहिष्कार घालण्याचा निर्णय डिजिटल मीडिया असोसिएशनने घेतला आहे. त्याचप्रमाणे बावनकुळे ह्यांनी पत्रकारांचा केलेल्या अपमानाचा निषेध करतानाच तुम्ही आम्हाला काय ढाब्यावर नेता आम्हीच तुम्हाला भोजनासाठी धाब्यावर  आमंत्रित करत असल्याचा निर्णय घेतला असून डिजिटल मीडिया संस्थेने ‘बावनकुळे ढाब्यावर या’ नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असून भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8:00 वाजता लोहारा ढाबा, चंद्रपूर येथे सावजी भोजनासाठी आमंत्रित केले आहे.

बावनकुळे ह्यांनी तथाकथितपणे पत्रकारांना नेकदा ढाब्यावर अनेकदा खाऊ घातले आणि चहाही दिला, त्यामुळे आता त्यांच्यासाठी आमच्याकडून ही रिटर्न गिफ्ट पार्टी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. बावनकुळे ह्यांच्या सन्मानार्थ आयोजित ढाब्यावरील ह्या भोजन समारंभाला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले नाहीत तर चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या त्यांच्या सर्व कार्यक्रमांचा बहिष्कार करण्यात येणार असल्याचे डिजिटल मीडिया असोसिएशनने जाहिर केले आहे.

आगामी नवरात्रीच्या काळात बावनकुळे ह्यांना ईश्वर तारतम्य ठेऊन बोलण्याची क्षमता प्रदान करो त्याचप्रमाणे त्यांच्या मुखकमलातून वाईट शब्द उच्चारल्या जाऊ नये यासाठी गणेशाने त्यांना बुद्धी आणि वरदान द्यावे, अशी प्रार्थनाही संस्थेने केली आहे. संघटनेच्या या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, कोषाध्यक्ष जितेंद्र जोगड, राजेश नायडू, दिनेश एकवणकर, जयपाल गेडाम हयांचेसाह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये