राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रोशन भोयर यांचे सुयश
पनवेल येथे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय जनता पार्टी, पदवीधर प्रकोष्ठ, शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य व आदर्श शैक्षणिक समूह नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, त्रिशताब्दीतून झळकलेली अहिल्या गाथा या पुस्तकाचे प्रकाशन व आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान सोहळा पनवेलच्या विसपुते सभागृहात पार पडला. या निबंध स्पर्धेमध्ये अहिल्यानगर च्या अमोल साबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर चंद्रपूरच्या रोशन भोयर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर सिंधुदुर्गच्या नीता सावंत यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यभरातून अकरा हजार एकशे चाळीस निबंधांमधून वीस निबंधांची निवड करण्यात आली होती. यामध्ये चंद्रपूरच्या रोशन भोयर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत जी ठाकूर,पदवीधर आमदार निरंजन जी डावखरे,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर जी म्हात्रे यांच्या हस्ते आठ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच निवडक 111 निबंधांचे पुस्तक प्रकाशन देखील करण्यात आले व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श विद्यारत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रपूरच्या रोशन भोयर यांचे विवेकानंद विद्यार्थी भवनचे भवन पालक स्वामी महाबलानंद जी महाराज,ग्रामपंचायत लखमापूरचे सरपंच अरुणजी जुनाके, सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार, प्रा. सुधीर थिपे ,मित्रपरिवार व समस्त गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.