ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोजगार कौशल्यावर सात दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि महिंद्रा राईज - नांदी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट

एसएनडीटी महिला विद्यापीठ बल्लारपूर केंद्र आणि महिंद्रा राईज – नांदी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल ( बल्लारपूर केंद्र ) येथे “रोजगार कौशल्य” या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्रातही विद्यार्थिनी सक्षम व आत्मनिर्भर व्हाव्यात या उद्देशाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सात दिवस चाललेल्या या कार्यशाळेत प्रशिक्षिका व सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता धोटे यांनी मुलाखत कौशल्य, संभाषण कौशल्य, रोजगार क्षेत्रातील बारकावे, आर्थिक नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, व्यवसाय आणि गुंतवणूक अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सातही दिवस विद्यार्थिनींनी पूर्ण संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण सहभाग दर्शवला.

समारोप प्रसंगी एस.एन.डी.टी. बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले,सहायक कुलसचिव डॉ. बाळु राठोड व समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते. या वेळी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तसेच डॉ. प्राजक्ता धोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

नेहाशा यादव, साक्षी भुणेकर, गुंजा व कशीश या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेचा अनुभव मांडला व ही कार्यशाळा त्यांच्यासाठी कशी उपयुक्त ठरणार आहे यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

आपल्या भाषणात डॉ. राजेश इंगोले यांनी, “विद्यार्थिनी सक्षम कर्मचाऱ्यांपुरत्याच मर्यादित न राहता रोजगारदात्याही बनाव्यात, स्वरोजगार निर्माण करावा, तेव्हा अशा कार्यशाळांची खरी उपयोगिता सिद्ध होते,” असे मत व्यक्त केले. त्यांनी डॉ. धोटे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

डॉ. वेदानंद अलमस्त यांनी आपल्या भाषणातून उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना कार्यक्षम होण्याचे आव्हान केले तसेच अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल असे सांगितले.

डॉ. प्राजक्ता धोटे यांनी मुलींनी कसल्याही पूर्वधारणा किंवा भीती न बाळगता प्रगती करावी, असे आवाहन करत विद्यार्थिनींचे उत्साहवर्धन केले व उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक प्राध्यापिका शीतल बिलोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन निहारिका सातपुते यांनी मानले. या प्रसंगी अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनी तसेच प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये