साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून जिनिंग कारखान्याचा शुभारंभ
कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांना थेट लाभ – आ. जोरगेवार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर येथील साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जिनिंग कारखान्याचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उद्घाटनानंतर तत्काळ कारखान्याच्या प्रत्यक्ष कामकाजालाही सुरुवात करण्यात आली. कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून रोजगार निर्मिती होणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला नामदेव डाहुले, घुग्घुस नगर परिषदेचे नगरसेवक विवेक बोढे, भाजप नेते प्रकाश देवतळे, मनोज पाल, आत्माचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, प्रिती हिरळकर, गणेश मादेवार, तुषार चौबे, नीरज बोंडे, विजल बलकी, नरेंद्र देवतळे, विजय चिंन्नावार, निरीक्षण तांड्रा, विनोद खेवले, किशोर बावणे, प्रलय मशाखत्री आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
या जिनिंग कारखान्यात परिसरातील शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी करण्यात येणार असून त्यावर प्रक्रिया करून दर्जेदार कापूस बाजारात उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापसासाठी योग्य दर मिळणार असून दलालांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक आणि विपणनाच्या दृष्टीने भक्कम पाठबळ मिळणार आहे. कापूस खरेदी, जिनिंग प्रक्रिया आणि थेट विपणन यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या कारखान्यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. युवकांचे सक्षमीकरण होऊन परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वासही आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



