शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि हरित पद्धतीने साजरा करण्याचा मुख्य उद्देश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 26 शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थी या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, पारंपरिक कला जोपासणे आणि सण हरित पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून आकर्षक व कलात्मक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेतून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम’ तसेच ‘शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक फायदे’ याबाबत माहिती देण्यात आली.
हा उपक्रम महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी श्री. नागेश नीट यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात पार पडला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकवर्गाचा सहभाग आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
महानगरपालिकेतर्फे भविष्यातही अशा प्रकारच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणली जाणार आहे.