उसगाव आंदोलनाला यश : 103 प्रोजेक्ट बाधितांना मिळणार रोजगार

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर – थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी सुरू झालेल्या उसगाव आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शनिवार (23 ऑगस्ट 2025) पहाटे 4 वाजल्यापासून विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनी परिसरात सुरू असलेले आंदोलन आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले.
माहितीनुसार, रोजगार आणि थकीत वेतनाच्या मागणीसाठी आठ आंदोलक टॉवर (चिमणी) वर चढून ठिय्या देऊन बसले होते. या दरम्यान आमदार जोरगेवार स्वतः आंदोलन स्थळी पोहोचले आणि कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात तब्बल चार तास बैठक घेतली. त्यांच्या पुढाकारामुळे तडजोड झाली आणि आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
समझोत्याचे मुख्य मुद्दे
कंपनी व्यवस्थापनाने 103 प्रोजेक्ट बाधितांना 10 सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी ठेका पद्धतीवर काम देण्यास सहमती दर्शवली.
सहा महिन्यानंतर सर्व बाधितांना कायमस्वरूपी समाविष्ट करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
कामगारांचे थकीत वेतन आणि सेवा सुविधांच्या सोडवणुकीवरही सहमती झाली.
आंदोलनादरम्यान संघटनेचे सरचिटणीस महेंद्र मारोती वडसकर यांनी सांगितले की, “कामगारांचे थकीत वेतन, सेवा सुविधा आणि रोजगाराची हमी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.” त्यांनी हेही स्मरण करून दिले की 2012-13 पासून प्रोजेक्ट बंद आहे आणि 2017 मध्ये कंपनी NCLT अंतर्गत गेल्यानंतरही कायमस्वरूपी कामगारांच्या समस्या सुटलेल्या नाहीत.
आमदार जोरगेवार यांनी आंदोलन स्थळीच स्पष्ट केले की, “कामगारांवर अन्याय सहन केला जाणार नाही, जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही.” अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपली मागणी मान्य झाल्याने आंदोलन मागे घेतले.
या वेळी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, एसडीपीओ सुधाकर यादव, तहसीलदार ओमकार ठाकरे, ठाणाप्रमुख राऊत, कंपनी व्यवस्थापनाचे आशिष नरळ व दीपक गुप्ता, भाजप नेते आशिष मासीरकर, प्रवीण लांडगे, उचगाव सरपंच निविदा ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर आणि मंडळ अध्यक्ष विनोद ठेवले हेही उपस्थित होते.
हा समझोता आंदोलक कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.